पन्नास हजारपेक्षा अधिक रक्कम नेण्यावर बंधने

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पडद्यामागून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बनावट नोटांचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रोकड घेऊन जाण्यासाठी आर्थिक व्यवहाराचा तपशील पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट नोटांच्या बंडलांची वाहतूक करणे आता सोपे राहिलेले नाही, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस सूत्राने ठाणे लोकसत्ताशी बोलताना दिली.

निवडणुकीच्या काळात बनावट नोटांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पुढे आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत असा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही राजकीय पक्षाची मंडळी खासगीत या वृत्ताला दुजोरा देत आहेत. हे टाळण्यासाठी यंदा पोलिसांनी कधी नव्हे इतका कडक बंदोबस्त शहरात ठेवला आहे. कल्याण डोंबिवली शहरातील प्रवेशद्वारांवर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.

बनावट नोटांचा कोठे वापर होत आहे, त्या कोठून आणल्या जात असतील तर जागरूक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पैशांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ५० हजारांपेक्षा अधिक रोकड नेताना यासंबंधीच्या व्यवहाराची सविस्तर माहिती तपास यंत्रणांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे पैसे कोठून आले, तसेच ते कोणाकडे न्यायचे आहेत, यासंबंधीचे लेखी व्यवहार पोलिसांना दाखवावे लागतील. त्यानंतरच अशी वाहतूक करता येणार आहे.