कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक हॉटेल-बार, उपहारगृह, फूट कोर्ट, मद्यालये व इतर आस्थापना करोना प्रतिबंधांच्या र्निबधांचे पालन करीत नाहीत. संध्याकाळी चार वाजल्यानंतरही हॉटेल, इतर आस्थापना सुरू असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे गुरुवारपासून निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांना १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.

पालिका हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत अनेक हॉटेल-बार, उपहारगृह, खाद्यालये, मद्यालये संध्याकाळी चार वाजताची वेळ मर्यादा पाळत नाहीत. घरपोच खाद्य सेवा पुरविण्याच्या नावाखाली हॉटेल सुरू ठेऊन तेथे ग्राहक सेवा देतात. हॉटेलमध्ये आलेल्या अनेकांकडे, कर्मचाऱ्यांना मुखपट्टी नसते. तरी ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जातो. गेल्या आठवडय़ात अशाप्रकारची आठ हॉटेल, बार, उपहारगृह, इतर आस्थापना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशावरून टाळे बंद करण्यात आली. हॉटेल, आस्थापना वेळेनंतर सुरू असली की तेथे ग्राहक गर्दी करतात. त्या गर्दीवर हॉटेल चालक नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वेळेचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार, उपहारगृह, खाद्यालये, मद्यालये यांना पहिल्या फेरीत १० हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आस्थापना दुसऱ्या फेरीतील पाहणीत निर्बंधांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. तिसऱ्या भेटीच्यावेळी नियमांचे पालन करीत नसेल तर ते करोना अधिसूचना संपुष्टात येईपर्यंत टाळे बंद केले जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे.