सर्वसाधारण सभेतही रिव्हॉल्व्हरसह प्रवेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसाधारण सभेत सोमवारी सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर नगरसेवकांच्या बेशिस्तीचा आणखी एक नमूना समोर येत आहे. सुमारे ५० ते ६० नगरसेवक पालिकेच्या सभागृहातही कमरेला पिस्तूल लटकवून वावरत असल्याचे समोर येत आहे.

पालिका सुरक्षा नियमावलीप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाने महासभेला येताना आपले परवानाधारी अग्निशस्त्र प्रवेशद्वारावरील सुरक्षा दालनात जमा करणे बंधनकारक आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या सोबतीला असलेल्या रक्षकांपैकी फक्त एका सुरक्षारक्षकाला पालिकेत प्रवेश आहे. अशी नियमावली असताना तीन ते चार नगरसेवक फक्त सुरक्षा दालनात पालिका सुरक्षारक्षकांकडे आपली अग्निशस्त्रे जमा करून सभागृहात प्रवेश करत असल्याचे समोर येत आहे. उर्वरित नगरसेवक रिव्हॉल्व्हर, पिस्तूल घेऊनच सभागृहात बसतात, अशी माहिती पालिकेच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीच दिली.

पालिकेतील काही नगरसेवकांमध्ये कट्टर पूर्ववैमनस्य आहे. त्यामुळे एकमेकांवर जरब बसवण्यासाठी हे नगरसेवक अग्निशस्त्र घेऊन सभागृहात शिरतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सुरक्षारक्षकांची गुंडगिरी

कडोंमपाचे तत्कालीन आयुक्त रवींद्रन यांनी नगरसेवकांच्या खासगी सुरक्षारक्षकांच्या वाहनांना पालिकेत प्रवेश बंद केला होता. मात्र, रवींद्रन यांची बदली झाल्यानंतर सुरक्षारक्षकांची मुजोरी पुन्हा वाढली आहे. काही नगरसेवकांकडे १० ते १५ सुरक्षारक्षक आहेत. हे सगळे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत. काही सुरक्षारक्षक तर स्थायी समितीच्या दालनाबाहेरील खुच्र्यावर बसून असतात.

पालिका सभागृहात जाणाऱ्या ज्या गेल्या दोन ते तीन वर्षांत कोणत्या नगरसेवकांकडे परवानाधारी शस्त्रे आहेत याची पडताळणी केली जाईल. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून ही माहिती घेण्यात येईल. त्याप्रमाणे नगरसेवकांकडील शस्त्रे दालनात जमा करण्याची कार्यवाही कठोर केली जाईल.

– भरत बुळे, साहाय्यक सुरक्षा अधिकारी, कडोंमपा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc house corporators with weapon
First published on: 12-09-2018 at 03:59 IST