शीळफाटा रस्त्यावरील पालिकेचा खर्च वाया जाण्याची भीती

कल्याण-शीळफाटा  रस्त्यावरील पत्रीपूल ते निळजे गावापर्यंतच्या पालिका हद्दीतील रस्त्यावर पालिकेच्या विद्युत विभागाने २ कोटी २० लाख खर्चून नवीन विजेचे खांब-दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या अंधारात असणारा शीळफाटा रस्ता झळाळून निघेल, असे म्हटले जात असतानाच या मार्गावर उभारण्यात येणारा उन्नत पूल या पथदिव्यांना अडसर ठरण्याची शक्यता आहे.

दीड वर्षांपूर्वी २७ गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. या गावांच्या हद्दीतून जाणारा कल्याण-शीळफाटा रस्ता पालिका हद्दीत आला. हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) आधिपत्त्याखाली आहे. या रस्त्यावरून होणारी वाहतूक ही पालिका हद्दीतून होत असल्याने, या रस्त्यांवर पथदिवे बसविण्याची मागणी या भागातील नगरसेवकांकडून करण्यात येत होती. या रस्त्याच्या दुतर्फा पालिकेने यापूर्वी बसविलेले विजेचे खांब आहेत. त्यांची देखभाल नसल्याने हे खांब गंजले आहेत. अनेक पथदिव्यांचे दिव्यांची वेष्टने तुटली आहेत. कल्याण-शीळफाटा महामार्ग ‘एमएसआरडीसी’च्या ताब्यात असला तरी, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतून हा महामार्ग जात असल्याने त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी पालिकेच्या विद्युत विभागाने ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. २ कोटी २० लाख ८४ हजार रुपयांना हे काम देण्यात येणार आहे. ठेकेदाराने शीळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर ते निळजे गाव उड्डाण पूल या दोन ते तीन किलोमीटरच्या रस्त्यादरम्यान गॅल्व्हनाइज्ड कोनिकल्सचे २६८ विजेचे खांब उभारायाचे आहेत. हे खांब नऊ मीटर उंचीचे आहेत. नऊ सोडियम उंच प्रकाश झोताचे खांब, २५० व्ॉटचे ५३६ सोडियम खांब बसविण्यात येणार आहेत.

शीळफाटा रस्त्याच्या झगमगाटासाठी विद्युत विभागाने अशी जय्यत तयारी सुरू केली आहे. याचवेळी ‘एमएसआरडीसी’ने पालिकेच्या सहकार्याने पत्रीपूल ते निळजेपर्यंतच्या रस्त्याचे उन्नत (इलेव्हेटेड) पुलाच्या कामासाठी नुकतेच सर्वेक्षण पूर्ण केले. येणाऱ्या काळात उन्नत पुलाच्या कामासाठी व रस्त्याची वाढती गरज म्हणून कल्याण ते शीळफाटा रस्ता शासनाने दोन्ही बाजूंनी तीन ते चार मीटर रुंदीकरण केला तर, पालिकेने रस्त्याच्या दुतर्फा बसविलेले विजेचे खांब पुन्हा काढावे लागणार आहेत. किंवा स्थलांतरित करावे लागणार आहेत. उन्नत पुलाची उभारणी झाल्यानंतर विजेचे दिवे खाली जाऊन उन्नत पुलाचा झाकोळ त्याच्यावर येण्याची शक्यता काही ठेकेदार, अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पालिकेचा पथदिव्यांवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कल्याण-शीळफाटा उन्नत (इलेव्हेटेड) रस्त्याबाबत आपणास काहीही माहिती मिळालेली नाही. शीळफाटा रस्त्यावर पथदिवे बसविण्याच्या कामाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे हे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया, ठेकेदार नियुक्ती ही कामे बाकी आहेत. दरम्यानच्या काळात एमएसआरडीसीकडून उन्नत रस्त्याबाबत काही माहिती आली तर त्याप्रमाणे निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येईल.

– यशवंत सोनावणे, कार्यकारी अभियंता, कडोंमपा.