News Flash

कल्याण-डोंबिवली राज्यातील सर्वात बकाल महापालिका!

राज्यात अनेक महापालिका आहेत. तेथेही प्रशासन आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांची शिवसेनेवर टीका

राज्यात अनेक महापालिका आहेत. तेथेही प्रशासन आहे. पण कल्याण-डोंबिवलीसारखी बकाल महापालिका आपण कोठेही पाहिलेली नाही, अशी टीका करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.
२७ गावांमधील सोनारपाडा येथे भाजपतर्फे प्रचार सभेचे आयोजन केले होते. केंद्र, राज्य सरकारकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेला वेळोवेळी कोटय़वधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मिळाला. हा निधी येथल्या सत्ताधारी मंडळींनी फस्त केला. त्यामुळे कचरा, क्षेपणभूमी, रस्ते, खड्डे हे विकासाचे विषय चिघळले. गेल्या २० वर्षांत क्षेपणभूमीचा प्रश्न सोडवू न शकल्याने पालिका हद्दीतील बांधकाम परवानग्या थांबवण्याची वेळ न्यायालयावर आली. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा हा उत्तम नमुना आहे, असे दानवे म्हणाले. २७ गावांच्या विकासासाठी भाजप प्रयत्नशील आहे. महापालिका निवडणुकीनंतर गावक ऱ्यांच्या मागणीप्रमाणे या भागाची नगरपालिका होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दानवे यांनी दिले.
यावेळी खासदार कपिल पाटील, सचिव अर्चना वाणी, आमदार संजीव कुटे, माजी आमदार रमेश पाटील, आमदार किसन कथोरे, संघर्ष समितीचे गुलाब वझे, गंगाराम शेलार, चंद्रकांत पाटील, गणेश म्हात्रे उपस्थित होते.
लक्षवेधी लढती

टिळकनगर (प्रभाग क्र. ७५)

शिवसेनेचा शिरकाव

टिळकनगर मध्यमवर्गीय, सुशिक्षित मतदारांचा प्रभाग आहे. आतापर्यंत या प्रभागाने भाजप, मनसेला साथ दिली आहे. मागील पाच वर्षे मनसेने या प्रभागाचे नेतृत्व केले. या वेळी या प्रभागात भाजपतर्फे राजन आभाळे, शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचे चिरंजीव अभिजित, मनसेतर्फे मिहीर दवते रिंगणात आहेत. हा प्रभाग राखण्यासाठी भाजप, मनसेचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या प्रभागात भाजप आमदार समर्थक कार्यकर्ता निवडणूक लढवीत आहे. या प्रभागातील काही नाराज भाजपची मंडळी शिवसेनेचा प्रचार करीत आहेत. मनसेने या प्रभागात विकासकामे करून दाखवली हा विषय घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत. शिवसेनेने या प्रभागात प्रथमच मुसंडी मारल्याने ती रोखण्यासाठी अन्य पक्षांची धावपळ सुरू आहे. अशी ही तिरंगी लढत टिळकनगर प्रभागात आहे.

संतोषनगर तिसगाव (प्रभाग क्र. ८८ )

गायकवाडांमध्ये तिरंगी

कल्याण पूर्व भागातील संतोषनगर हा खानदेशी, कोकणी, उत्तरभाषीक असा मिश्र वस्तीचा प्रभाग आहे. या प्रभागात भाजपतर्फे विष्णू गायकवाड, शिवसेनेतर्फे महेश गायकवाड, मनसेतर्फे अनंता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कैलास काळे निवडणूक लढवीत आहेत. माजी नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी या भागात सामाजिक कार्य केले आहे. ते कार्य व यापूर्वी केलेली विकासकामे समोर ठेवून ते मतदारांना सामोरे जात आहेत, तर अन्य उमेदवार विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लोकग्राम (प्रभाग क्र. ४२)

धनशक्ती विरुद्ध सामान्य शक्तीची लढत

कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाजवळील नोकरदार, व्यावसायिक सुशिक्षित वस्ती असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागात सरकारी सेवेत राजपत्रित आरोग्य अधिकारी म्हणून २२ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले डॉ. मोरेश्वर घोरमोडे निवडणूक लढवीत आहेत. या भागातील सुयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. या प्रभागात निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे सामाजिक कामे केली आहेत. या प्रभागात शिवसेनेचे मालदार उमेदवार मल्लेश शेट्टी, मनसेतून भाजपत दाखल झालेले नरेंद्र गुप्ते, मनसेचे निरानंद निगडे निवडणूक लढवीत आहेत. तेरा उमेदवार या प्रभागात रिंगणात आहेत. धनशक्ती विरुद्ध सामान्य शक्ती अशी लढत या प्रभागात होणार आहे.
उंबार्ली-भाल-दावडी (प्रभाग क्र. ११७)

समाज की पक्ष यामध्ये लढत

२७ गावांमधील उंबार्ली, भाल आणि दावडी हा एक महत्त्वाचा प्रभाग आहे. या प्रभागातून भाजपचे जालिंदर पाटील, शिवसेनेचे सुखदेव पाटील निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही पाटील भूमिपुत्र आहेत. संघर्ष समितीने २७ गावांमधील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेमुळे ही निवडणूक लढवावी लागत असल्याने समितीने भाजप, मनसे आणि अपक्ष उमेदवार हे समितीच्या झेंडय़ाखाली लढणारे उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. आगरी समाज म्हणून मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन मेळाव्यात करण्यात आले आहे. ही निवडणूक पक्ष की समाज अशीच होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 12:52 am

Web Title: kdmc is worst bjp leader
Next Stories
1 शिवसेनेचे स्थायी समिती सभापती कोटय़धीश
2 पैसे वाटपाच्या संशयावरून शिवसेना कार्यकर्त्यांना मारहाण
3 ‘म्हाळगी, कापसेंचा भाजप राहिला नाही!’
Just Now!
X