15 July 2020

News Flash

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नोटिसा

दोन महिने गैरहजर राहिल्याने कारवाईची शक्यता

संग्रहित छायाचित्र

दोन महिने गैरहजर राहिल्याने कारवाईची शक्यता

कल्याण : अत्यावश्यक सेवेत असूनही गेल्या दोन महिन्यांपासून कामावर गैरहजर राहिलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ७३ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत. कर्मचाऱ्यांकडून उत्तर येताच पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

करोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रशासनाने मागील दोन महिन्यांत पालिकेच्या २५ विभागांमधील सुमारे ३०० ते ४०० कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण कामासाठी नियुक्त केले होते. वैद्यकीय विभागाच्या मागणीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश काढले होते. या कर्मचाऱ्यांमध्ये लिपिक, अधीक्षक, अभियंता संवर्गातील कर्मचारी होते. यामधील अनेक कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत.

सर्वेक्षण, रुग्ण सेवा, आरोग्य केंद्रांसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना कर्मचारी हजर झाले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांच्या साहाय्याने ही कामे प्रशासनाला करावी लागली. त्यामुळे प्रशासनाने नियुक्त गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्यास सुचविले आहे. सबळ कारण नसेल तर त्यांच्यावर आपत्ती कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेचे साहाय्यक आयुक्त अरुण वानखेडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

महापालिका हद्दीतील करोना रुग्ण संख्या वाढत आहे. यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची प्रशासनाला गरज आहे. पावसाळा सुरू होत आहे. कार्यालयातील ५० टक्के उपस्थिती शासन आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी भरणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात आयुक्तांनी वारंवार आदेश काढूनही त्यास कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला असल्याचे कळते.

कर्मचाऱ्यांची कारणे

प्रशासनाने गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असला तरी या कर्मचाऱ्यांनीही आपल्या गैरहजेरीची कारणे दिली आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी आपण मुंबई, ठाणे तसेच ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात राहात असल्याने व वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने कामाच्या ठिकाणी येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने बस सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी कामाच्या ठिकाणी पोहचणे शक्य असले तरी पुन्हा परतण्याची वाहन सुविधा निश्चित नसल्याने कामावर जाणे शक्य झाले नाही, असेही कर्मचारी सांगतात. अपंग कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतून वगळण्यात आले असले तरी पालिका प्रशासनाने आपल्याला हजर राहण्याचे आदेश दिल्याचा आरोप काही अपंग कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर वाहतुकीची साधने नसतानाही सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आल्याबद्दल काही महिला कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 2:31 am

Web Title: kdmc issue notice to essential service employees zws 70
Next Stories
1 उल्हासनगरातील बाजारपेठा खुल्या होणार
2 धर्मगुरूच्या वाढदिवसामुळे भक्तांना करोनाबाधा
3 राष्ट्रगीताने करोना रुग्णांना निरोप
Just Now!
X