कल्याणमध्ये शिवसेनेतूनच देवळेकरांना हटवण्याचे प्रयत्न

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात, असा ठपका ठेवत दोन दिवसांपूर्वी आयुक्त दालनावर हल्लाबोल करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांचा खरा निशाणा महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यावर होता, अशी उघड चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिकेतील अनागोंदीवर बोट ठेवत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेतील काही दिग्गज नगरसेवकांनी तुलनेने मवाळ अशी प्रतिमा असणारे महापौर देवळेकरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीतील एका तरुण नगरसेवकाला आतापासूनच महापौरपदाची स्वप्ने पडू लागली असून त्यातूनच ‘देवळेकर हटाव’ अशी छुपी मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ‘अस्वस्थ’ नगरसेवकांची मोट बांधत बुधवारी आयुक्त दालनावर चालून गेलेल्या या दिग्गज नगरसेवकांचे खरे लक्ष्य देवळेकर होते, अशी चर्चा असून यामुळे सत्ताधारी शिवसेनेतील सुंदोपसुंदी उघड होऊ लागली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी गेल्या काही महिन्यांपासून या पक्षाच्या दिग्गज नगरसेवकांची महापालिकेतील अर्थकारणावरील पकड सुटू लागल्याची चर्चा आहे. येथील कंत्राटांमध्ये पक्षातील काही ठरावीक नगरसेवकांचा प्रभाव नेहमीच दिसून आला आहे. निविदा, टक्केवारी, ठरावीक ठेकेदार असे सगळे जुळवून आणणारी ‘गोल्डर गँग’ येथे अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचा मवाळ चेहरा अशी ओळख असलेल्या देवळेकरांनी पालिकेतील टक्केवारीच्या राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वयाने वागण्यावर त्यांचा भर असला तरी त्यामुळे काही मुजोर अधिकारी गेल्या काही काळापासून बेदरकारपणे वागत असल्याची टीका महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. तसेच शहरातील फेरीवाले, खड्डे, अस्वच्छता या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीही देवळेकरांना ठोस काही करता आले नाही. त्यामुळे या प्रश्नांचे भांडवल करत शिवसेनेतील अस्वस्थ नगरसेवकांचा एक गट देवळेकरांविरोधात एकवटला असून डोंबिवलीतील एका तरुण नेत्याची या गटाला साथ असल्याचे बोलले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पालिका कर्मचारी कामच करीत नाहीत. फेरीवाल्यांची पाठराखण करतात म्हणून शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे व त्यांच्या युवा सेनेचे समर्थक, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या गटाने फेरीवाल्यांच्या विरोधात डोंबिवलीत तीव्र आंदोलन केले होते. सेनेचा महापौर असताना नगरसेवक फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरत आहेत हे दाखविण्याचा हा प्रयत्न होता. देवळेकरांवर मातोश्री नाराज असल्याने त्यांना कार्यकाल संपण्यापूर्वीच पायउतार व्हावे लागेल, अशी चर्चाही नाराजांच्या गटामार्फत सुरू झाली आहे. रिक्त पदावर वर्णी लागावी यासाठी या मंडळींची मोर्चेबांधणी सुरू असतानाच बुधवारी आयुक्त कार्यालयावर सेना नगरसेवकांनी केलेल्या हल्लाबोलाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून महापालिकेची बेताची आर्थिक स्थिती, राज्य सरकारचे असहकार्य, सतत बदलणारे आयुक्त, सेना-भाजप या सत्ताधारी पक्षांमधील कुरबुरी यांवर मात करत मी अनेक कामे पूर्ण करत आहे. शहरात विकासकामे सुरू आहेत आणि यापुढेही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कामे करत राहीन. बाकी विषयावर मी बोलणे उचित नाही.

राजेंद्र देवळेकर, महापौर