पालिकेने काम करून वाऱ्यावर सोडल्याने स्वयंसेवकांमध्ये नाराजी
कल्याण : करोना काळात कष्टकरी वर्गातील तरुण, तरुणी, महिलांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरोघरी जाऊन करोना रुग्ण, संशयितांचे सर्वेक्षण करण्याचे काम केले. या स्वयंसेवी कार्यकर्त्यांना पालिकेने १०० घरांमागे ३५० रुपये देण्याचे कबूल केले होते. हे सर्वेक्षण पूर्ण करून महिना उलटला तरी प्रभाग अधिकारी आणि आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यातील लालफितीच्या कारभारामुळे कार्यकर्त्यांना मानधन मिळाले नाही. याविषयी कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील करोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य केंद्रातील सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना सहकार्य व्हावे म्हणून पालिकेने शहरातील अनेक सामाजिक संस्था, गरजू, होतकरू मुले, मुलींना घरोघरच्या करोना सर्वेक्षण कामासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. कार्यकर्त्यांनी एका दिवसात १०० घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले की त्या स्वयंसेवकाला ३५० रुपये मानधन देण्यात येईल, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. सुरेश कदम यांनी जाहीर केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू, होतकरू, कष्टकरी, मुले, मुली, महिला, काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते पुढे येऊन पालिकेला सहकार्य करण्यासाठी करोना सर्वेक्षण कामात सहभागी झाले होते. प्रभागांप्रमाणे या स्वयंसेवकांनी घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांना ताप, सर्दी, खोकला यांची लक्षणे आहेत का, त्यांची प्राणवायू पातळी, त्यांचा अन्य कोणाशी संपर्क झाला आहे. त्यांचा नाव, पत्ता, भ्रमणध्वनी लिहून घेण्याची कामे केली. सर्वेक्षण अहवाल काम करत असलेल्या आरोग्य केंद्रात जमा करायचा होता. स्वयंसेवक मानधनाच्या अपेक्षेने करोना संसर्गाची भीती न बाळगता किट घालून या कामात सहभागी झाले होते. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कामाप्रमाणे या स्वयंसेवकांना पालिकेने तातडीने त्यांचे प्रस्तावित मानधन देणे गरजेचे होते. मानधन कार्यकर्त्यांना आरोग्य केंद्रातून मिळाले नाहीच. याउलट आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मानधन देण्याची जबाबदारी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याची आहे. ‘तुमचा अहवाल तिकडे पाठविला आहे. तुम्हाला तिकडूनच मानधन मिळेल’, असे सांगतात. तर प्रभाग अधिकारी या स्वयंसेवकांना ‘तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मानधन मिळेल’, असे उत्तर दिले जात आहे. स्वयंसेवकांनी घरोघर जाऊन खरच सर्वेक्षण केले आहे का, त्यांच्या दैनंदिन कामाचा अहवाल आम्हाला देण्यात यावा. मगच आम्ही त्याचा विचार करू’, अशी उत्तरे प्रभाग अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देत आहेत. वैद्यकीय अधिकारी आम्ही स्वयंसेवकांचा अहवाल तुम्हाला पाठविला आहे त्या आधारे स्वयंसेवकांचे मानधन काढण्याची मागणी प्रभाग अधिकाऱ्यांकडे करत आहेत. या दोन अधिकाऱ्यांच्या वादात स्वयंसेवकांची काम करून नाहक होरपळ होत आहे.
पालिकेच्या सर्वेक्षण कामात आपल्याशी परिचित तरुण, महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांना कामाची गरज होती. काम करून अनेक दिवस झाले तरी पालिका त्यांना त्यांचे मानधन देण्यास तयार नाही. पालिकेच्या ई प्रभागात कार्यालयात याविषयी विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रभाग अधिकारी की वैद्यकीय अधिकारी मानधन देणार हेदेखील सांगितले जात नाही. कार्यालयात स्वयंसेवकांना कोणी विचारतही नाही. काम करून स्वयंसेवकांची हेळसांड करणे योग्य नाही. मानधन दिले नाहीतर पालिकेसमोर उपोषण सुरू करेन.
– मनीषा राणे, सामाजिक कार्यकर्त्यां.
सर्वेक्षणाचे काम केलेल्या स्वयंसेवकांचे मानधन प्रभाग अधिकारी यांच्याकडून मिळेल अशी तरतूद केली आहे. स्वयंसेवकांचे मानधन कोणत्याही परिस्थितीत अडवून ठेवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तेथे मानधन मिळण्यात अडचण असेल तर त्यांनी थेट आपल्या विभागाशी संपर्क साधावा.
– सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
जोखीम स्वीकारून स्वयंसेवकांनी पालिकेच्या आवाहनानुसार प्रामाणिकपणे सर्वेक्षणाचे काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना वेळीच देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. स्वयंसेवकांना ँपैसे देण्यात येत नसतील तर अधिकाऱ्यांची निष्क्रियता दिसून येते. प्रभाग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या वादात हा विषय अडकला आहे. त्यात कोणी वरिष्ठ लक्ष घालत नाही. हे खेदजनक आहे. वैद्यकीय आरोग्य प्रमुखांनी हा विषय मार्गी लावावा.
– मंदार हळबे, नगरसेवक.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 4:08 am