कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयातील पत्रकार कक्षाच्या बाहेरील स्लॅब कोसळण्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारातील छताचे प्लॅस्टर कोसळले. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी पालिका इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यासही प्रशासनाला का वेळ नाही सा प्रश्न उपस्थित होतो.
डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत आता जुनी झाली असून त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामानिमित्त येथे नागरिक तसेच पालिका अधिकारी कायम ये-जा करीत असतात. महापालिकेत सामील झालेल्या २७ गावांचा कारभार अतिरिक्त आयुक्त येथेच बसून पहात असल्याने ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची वर्दळही येथे जास्त असते. स्लॅबचे प्लॅस्टर कोसळल्यानंतर ग प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांनी जागेची पहाणी केली. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे, असे पवार यांनी सांगितले.
इमारत जुनी झाली असून ठिकठिकाणी छताला तडे गेले आहेत. तसेच इमारतीच्या शौचालयात पाण्याची गळती होत आहे. पाण्याच्या कुलरच्या बाजूला पाणी साचून तेथे चिखल झाले आहे. या जागेची स्वच्छता आणि देखभालीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.