शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट क्राँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होते. वाहतूक कोंडीतच एक ते दोन तास वाहन अडकून पडत असल्याने शालान्त परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी महापालिकेला शालांत परीक्षेच्या काळात रस्त्यांची कामे बंद ठेवावीत अशी मागणी केली आहे. या मागणीनुसार महापालिकेने येत्या २० फेब्रुवारीपासून मानपाडा व कल्याण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दहावीची परीक्षा सुरू असताना नव्याने रस्त्यांची कामे काढणार नाहीत, असाही निर्णय घेतला आहे.
शहरात सध्या विविध रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात होते. रस्त्यांच्या सिमेंट क्राँक्रिटीकरणाची कामे संथ गतीने सुरू असून रिक्षा चालकही मनमानीपणे रिक्षा कोठेही उभ्या करत आहेत. फेरीवाल्यांचा विळखा, रिक्षा स्टँड, पार्किंगची समस्या आणि वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या यामुळे वाहतूक नियमांचा बोजवारा उडाला आहे. सध्या फडके रोड, फुले रोड, पाटकर रोड, कोपर, मानपाडा रस्ता, राजाजी रोड, कल्याण रस्ता या रस्त्यांची कामे सुरू आहेत. येत्या २३ फेब्रुवारीपासून १२ वी तर २ मार्च पासून १० वीची शालांत परीक्षा सुरु होत आहेत. या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे यासाठी नव्याने रस्ते खोदण्यात येऊ नयेत, अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता येणार नाही, हे लक्षात घेऊन डोंबिवली शहर वाहतुक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक बी. ए. कदम यांनी या दिवसांत रस्ते खोदण्याचे काम करण्यात येऊ नये अशी मागणी पालिकेकडे नुकत्याच झालेल्या बैठकीत केली. त्यांची ही मागणी पालिकेने मान्य केली असून येत्या २० फेब्रुवारीपासून कोणत्याही रस्त्याचे काम नव्याने सुरू होणार नाही.  

वाहतुक विभागाने अशी सूचना केली असून, नव्याने रस्ते खोदण्यात येणार नाहीत. मानपाडा व कल्याण रोड हे महत्त्वाचे रस्ते असून सध्या वाहतुकीसाठी अर्धे बंद असले तरी येत्या २० फेब्रुवारीपासून हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत,
– प्रमोद कुलकर्णी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता