विकासकामांसाठी निधीची चणचण, * ‘अभ्यास’ दौऱ्यांसाठी मात्र ४० लाख

स्थानिक स्वराज्य संस्था कर, जकातवसुली बंद झाल्याने घटलेले उत्पन्न आणि लोकसंख्येच्या तुलनेत सुविधांवर वाढलेला खर्च यामुळे आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांचा तिजोरीवर डल्ला मारणे मात्र सुरूच आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून कल्याण, डोंबिवली शहरांतील विविध विकासकामे निधीअभावी रखडल्याचे चित्र एकीकडे असताना, सर्वपक्षीय नगरसेवकांच्या ‘अभ्यास दौऱ्या’च्या नावाखाली काढण्यात येणाऱ्या सहलींवर मात्र लाखोंची उधळपट्टी सुरू आहे. अभ्यास दौऱ्याचे कारण सांगून सहलींवर जाणाऱ्या या नगरसेवकांच्या अभ्यासाचा अहवाल तर मिळणे दूरच; उलट पालिकेच्या तिजोरीला मात्र घरघर लागत आहे. विशेष म्हणजे, अभ्यास दौऱ्यासाठी राखून ठेवलेला ४० लाखांचा निधी संपवण्यासाठी येत्या १७ ते २३ डिसेंबरदरम्यान नगरसेवकांचा एक गट कोलकात्याची सफर करणार आहे.

अभ्यास दौऱ्यांवरून परतल्यानंतर संबंधित नगरसेवकाने आपला अहवाल प्रशासनाला देणे आवश्यक असते. परंतु, कडोंमपातील मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांचा अपवाद वगळता गेल्या चार वर्षांत एकाही नगरसेवकाने असा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे दौरे हे पर्यटन व मौजमजेचे माध्यम ठरल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

गेल्या चार वर्षांत अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली ७७ लाख १२ हजार रुपये खर्च झाले आहेत. मात्र, त्यातून पालिकेच्या कारभाराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणताही फायदा झालेला नाही. त्यातच आता १७ ते २३ डिसेंबर दरम्यान नगरसेवकांचा एक गट कोलकाता-गंगटोक येथे अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहे. विशेष म्हणजे, अभ्यासदौऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला ४० लाखांचा निधी संपवण्यासाठी ही ‘सहल’ आयोजित करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

निधीअभावी रखडलेले प्रकल्प

घनकचरा प्रकल्प, केडीएमटीसाठी नवीन बसची खरेदी, टिटवाळा वडवली मंजुनाथ शाळा उड्डाणपूल, डोंबिवली मासळी बाजार, सूतिकागृह

दौऱ्यांचा तपशील

सन २०१३- बंगळूर- २५ लाख ३१ हजार; २०१३- गुजरात, राजस्थान- १८ लाख ९० हजार; २०१४- केरळ- १५ लाख ९१ हजार; २०१७- म्हैसूर- १७ लाख.

अशा दौऱ्यामुळे अन्य पालिका कोणते प्रकल्प कशा पद्धतीने राबवितात ते पाहता येते. कल्याण डोंबिवली पालिकेत स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे. या पाश्र्वभूमीवर हा अभ्यास दौरा निश्चित उपयोगाचा आहे.

– मंदार हळबे, नगरसेवक, मनसे

नवीन सदस्यांना अन्य पालिकांचा कारभार, तेथील प्रकल्पांची माहिती मिळते. यापूर्वीच्या दौऱ्यांची सहल झाली की अन्य काही हे माहिती नाही.

– राजेश मोरे, नगरसेवक, शिवसेना</strong>

नगरसेवकांनी पहिले रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले कायमचे कसे हद्दपार होतील, कचऱ्याची समस्या कायमची कशी निकाली निघेल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय करता येईल हे प्रथम पाहावे. या सहज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. दौऱ्याने असे प्रश्न सुटणार नाहीत. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. नगरसेवकांनी आपले दौरे आता आटोपते घेऊन विकास कामांना प्रथम प्राधान्य द्यावे.

– अरविंद बुधकर, कल्याण

करदात्यांच्या पैशावर उडय़ा मारणाऱ्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरी समस्या सोडविल्या तरी शहर स्मार्ट होईल. गटारे, पायवाट, पदपथांमध्ये अडकलेल्या नगरसेवकांना शहर विकासाचा एकत्रित विचारच करायचा नाही हे पालिकेच्या मागील २२ वर्षांत दिसून आले. त्यामुळे नगरसेवक अमेरिका, इंग्लड काय गंगटोक कोठेही गेले तरी कल्याण डोंबिवली पालिकेला त्याचा काहीही फायदा होणार नाही.

-डॉ. आनंद हर्डिकर, डोंबिवली

 

पालिकेची स्थिती

* महसूल ७५० कोटी

* खर्च १३०० कोटी