पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडय़ाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पाणीकपातीमुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कडक उन्हाळ्याचे तीन महिने शिल्लक असताना आतापासूनच टंचाईच्या झळा सामान्यांना बसू लागल्या आहेत. या झळा येत्या काळात वाढण्याची शक्यता विचारात घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांसह २७ गावांमध्ये पाण्याचे नियोजन करण्यासाठी १२ कोटी ७७ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने कल्याण-डोंबिवली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण तसेच भिवपुरीजवळील आंध्र धरणात या वेळी पाण्याचा पुरेसा साठा नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवू नये यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाटबंधारे विभागाने जिल्ह्य़ातील विविध महापालिकांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शहरांनाही बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवली शहराला दररोज उल्हास नदी, बारवी धरणाच्या माध्यमातून ३०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाणीकपातीमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. उन्हाळा सुरू होताच या पाणीपुरवठय़ात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. हा विचार करून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या सूचनेवरून येत्या सहा महिन्यांतील पाणीपुरवठय़ाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी आपत्कालीन कृती आराखडा तयार केला आहे. या नियोजनाच्या माध्यमातून शहरातील विहिरी, पाण्याचे नैसर्गिक स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पाणीपुरवठय़ाचे नियोजन
* विहिरीतील गाळ काढण्यासाठी ८१ लाख रु.
* टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ७६ लाख रु.
* नळ पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये
* नवीन कूपनलिका खोदण्यासाठी ५.१६ कोटी रु.
* तात्पुरती नळ पाणी योजनेसाठी ३.९९ कोटी रु.

पाणीपुरवठय़ासाठी १५० सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करण्यात आली आहे. या विहिरींचे पाणी वापरात आणले आहे. २७ गावांसाठी वाढीव पाणीपुरवठा मिळावा, गावांमधील पाणी देयकाबाबत निर्णय घेण्यासाठी ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याबरोबर पालिका अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
– ई. रवींद्रन, कल्याण-डोंबिवलीचे महापालिका आयुक्त

बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पुढील जूनपासून कल्याण-डोंबिवली पालिकेला बारवी धरणातून वाढीव पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहे. शहरी भागासह २७ गाव झोपडपट्टी परिसरांत पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढू नये म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणारा आणखी एक कंत्राटदार नेमण्यात यावा.
– राजेंद्र देवळेकर, महापौर