कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सदनिका तसेच व्यावसायिक गाळ्यांचे मालक असलेल्या नागरिकांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाळेमालकाने मालमत्ता भाडय़ाने दिली की त्या भाडय़ाच्या मालमत्तेवर महापालिका ८३ टक्के कर आकारते. या भाडय़ाच्या रकमेतून घर मालकाला प्राप्तिकर, उदगमन (टीडीएस) कर असा एकूण १० टक्के कराचा सरकारी तिजोरीत भरणा करावा लागतो. त्यामुळे मालमत्ता भाडय़ाने देणाऱ्या मालकाला ९३ टक्के कराचा भरुदड बसतो. यामुळे अनेक घर मालक बोगस करार करून आपल्या भाडय़ाच्या मालमत्ता दडवून ठेवतात. यामुळे महापालिकेचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान होत आहे, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्याने या करात सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालमत्ता कराचे दर ठरविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. याविषयी चर्चा करताना उपमहापौर राहुल दामले यांनी या मुद्दय़ाला हात घातला. पालिका हद्दीतील अनेक नागरिक आपल्या सदनिका, गाळे भाडय़ाने देतात. या भाडय़ाच्या सदनिकांवर महापालिकेचा मालमत्ता कराचा बोजा असतो. त्याच बरोबर मालमत्ता भाडय़ाने दिल्याने पालिका त्या भाडय़ाच्या रकमेवर स्वतंत्र कर लावते. त्यामुळे एकाच सदनिकेवर पालिका ८३ टक्के कर आकारते. त्यामुळे भाडय़ाने दिलेल्या सदनिकांच्या दरात अधिक सुसूत्रता आणण्याची आवश्यकता दामले यांनी व्यक्त केली.
मालकाला भाडय़ातून मिळणाऱ्या रकमेवरील कर कमी करण्याचा ठराव यापूर्वीच करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही, असा मुद्दा मंदार हळबे यांनी मांडला. पालिकेचे ९५ टक्के महसुली उत्पन्न बुडते, असा मुद्दाही यावेळी हळबे यांनी मांडला.