कडोंमपा कर्मचाऱ्यांकडून दिवसभर गस्त
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असा चंगच आयुक्त ई. रवींद्रन यांनी बांधला आहे. तरीही, मुंबईतून आलेले फेरीवाले कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत. या फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटविले की, ते स्कायवॉकवर जाऊन बसत आहेत. या फेरीवाल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिल्यामुळे ‘क’ प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने बुधवारी दिवसभर या फेरीवाल्यांचा अक्षरश: पाठलाग करून त्यांना सळो की पळो करून सोडले.
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे फेरीवाले स्कायवॉकवर येऊन बसले. त्यानंतर पालिकेचा फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी आक्रमक होऊन या फेरीवाल्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे सामान घेऊन पळताना या फेरीवाल्यांची त्रेधातिरपीट उडाली. फेरीवाल्यांचे काही साहित्य पथकाने जप्त केले. स्कायवॉकवर व्यवसाय केला तर झटपट माल संपतो. सतत हातात पैसे खुळखुळतात. ग्राहकाची वाट पाहावी लागत नाही. त्यामुळे फेरीवाले स्कायवॉकवर व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. बहुतेक फेरीवाले भायखळा, मुंब्रा, मस्जिद, अंधेरी या भागातून कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करण्यासाठी येत आहेत.
स्कायवॉकवर बसू देण्यास विरोध केल्यामुळे हे सगळे फेरीवाले बुधवारी संध्याकाळी साधना हॉटेलकडील स्कायवॉकच्या कोपऱ्यावर साहित्य घेऊन बसले होते. पालिका कर्मचारी आले नाहीतर पुन्हा दुकान मांडून बसायचे, अशी फेरीवाल्यांची तयारी असते. पालिकेने एक महिनाभर कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर कायमस्वरुपी दोन कर्मचारी तैनात ठेवावे म्हणजे फेरीवाल्यांवर पूर्ण नियंत्रण मिळवणे पालिकेला शक्य होईल, असे प्रवाशांकडून सांगण्यात येते.

रेल्वे स्थानक परिसर मोकळा
अनेक र्वष फेरीवाले, रिक्षा, खासगी वाहनांनी गजबजलेला परिसर फेरीवाले हटविण्यात येत असल्याने आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभाग, आरटीओने कारवाई सुरू केल्याने अनेक रिक्षाचालक आपल्या भंगार रिक्षा बंद ठेऊन घरी बसले आहेत. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसर मोकळा दिसत आहे. पदपथांवरील बेकायदा दुकाने हटविण्यात आल्याने प्रवाशांना या रस्त्यावरून ये-जा करणे शक्य होत आहे.

सरबत विक्रेत्यांना अभय?
कल्याण रेल्वे न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरील तीन लिंबू सरबत विक्रेते फेरीवाल्यांना हटविण्याची एवढी कारवाई होऊनही, पालिका आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून हटविण्यात येत नसल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. हे सरबत विक्रेते पालिका अथवा रेल्वेचे जावई आहेत का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रेल्वे प्रवेशद्वार अडवून हे सरबत विक्रेते सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत रेल्वेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसत आहेत. या फेरीवाल्यांचा बाजार पालिका आणि रेल्वे पोलिसांनी एकत्रितपणे उठवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.