कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पथकाकडून कारवाई

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाने गुरुवारी संध्याकाळी रेल्वे स्थानक भागात कारवाई करून फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले. त्यांचे स्टॉल्स जागीच तोडून टाकले.

डोंबिवली पूर्व भागात सुमारे दोन ते तीन हजार फेरीवाले व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील फेरीवाल्यांची घुसखोरी झाल्याने पूर्व भागातील रस्त्यांवरून ये-जा करणे पादचाऱ्यांना अवघड झाले आहे. रेल्वे स्थानकापासून १५० मीटपर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव आहे.

तरीही, मर्यादा रेषा ओलांडून फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत, पथक प्रमुख विजयकुमार भामरे, वेदपाल तिसांबर यांच्या ३० कामगारांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी उर्सेकर वाडी, पाटकर रस्ता, रामनगर परिसरात कारवाई केली. यावेळी फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले. पळून जाणाऱ्या फेरीवाल्यांचे सामान ताब्यात घेण्यात आले. सामान ठेवण्याच्या स्टॉल्स, टेबल, स्टूल्सची जागीच मोडतोड करण्यात आली.

बहुतांशी फेरीवाले परप्रांतीय आहेत. महापालिकेचे पाच कर्मचारी कारवाईसाठी गेले की हे फेरीवाले त्यांना दांडगाई करून परतून पाठवतात.

त्यामुळे ग आणि फ प्रभागातील कामगारांनी एकत्रितपणे फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. अशीच कारवाई मागील सहा महिने सुरू होती. परंतु फ प्रभागाच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी पथके स्वतंत्र केल्याने कारवाईसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हते, असे कामगारांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू होती. नेहरू रस्त्यावरील पाणीपुरीच्या हातगाडय़ा हटविण्याची मागणी पादचाऱ्यांकडून केली जाते.

डोंबिवली पूर्व भागात ठाणे, मुंबई परिसरातून स्थलांतरित झालेल्या फेरीवाल्यांनी घुसखोरी केली आहे. दांडगाई करून हे फेरीवाले रेल्वे स्थानक भागातील रस्ते अडवून व्यवसाय करीत आहेत. गुन्हे दाखल करून, सतत कारवाई करूनही फेरीवाले हटत नसल्याने ही कारवाई करण्यात आली.