महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी करसंकलनाचे दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरत असलेल्या अधिकाऱ्यांवर आता पालिका आयुक्तांनी बडगा उगारला आहे. करवसुलीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन दिले जाऊ नये, असा फतवाच आयुक्त ई. रवींद्रन यांनी काढला आहे. येत्या पंधरवडय़ात महापालिकेचा आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. नव्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाची तारीख जवळ आली असताना जुनी उद्दिष्टे पूर्ण होत नसल्याने संतापलेल्या आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश दिल्याने येथील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षांतील अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींनुसार महापालिका आयुक्तांनी कर विभाग, पाणीपुरवठा विभाग, नगररचना विभागास कर तसेच विकास शुल्क वसुलीकरिता इष्टांक ठरवून दिले होते.जानेवारी महिन्याअखेरीस दिलेले उद्दिष्ट अधिकाऱ्यांना गाठता आलेले नाही.