कल्याण-डोंबिवली महापालिकेपुढे वसुलीचे आव्हान
कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाणी देयकातून चालू वर्षी ७८ कोटी ३१ लाख रूपये वसूल करण्याचे आव्हान होते. गेल्या सात महिन्यांत पाणी विभागाने ३२ कोटी ७३ लाख रुपये पाणी देयकातून वसूल केले आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यात प्रशासनासमोर पाणी देयकातून ४४ कोटी ६५ लाख रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
पाणी देयकातून चालू वर्षी पाणी विभागाला ७७ कोटी ३८ लाख रुपये वसुलीचे लक्ष्य आहे. या वसुली लक्ष्याप्रमाणे पाणी विभागातील कर्मचाऱ्यांनी दर महिन्याला ६ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात प्रशासनाने दर महिन्याला ४ कोटी ६७ लाख रुपये महसूल वसूल केला. म्हणजे, दर महिन्याला प्रशासनाने १ कोटी ७७ लाख रुपयांची कमी वसुली केली आहे.
येत्या तीन महिन्यात प्रशासनाला १४ कोटी ८८ लाख रुपये पाणी देयकातून वसूल करावे लागणार आहेत. गेल्या वर्षी पाणी विभागाला पाणी देयकातून सुमारे २० कोटींचा तोटा झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणी देयकाची सुमारे ८० कोटींची थकबाकी ग्राहकांकडे आहे. ही वसुली प्रशासनाची वेळोवेळी डोकेदुखी ठरत आहे. मालक, भाडेकरू वाद, न्यायालयीन खटल्यांमुळे पालिकेला ही पाणी देयकाची थकबाकी वसूल करणे प्रशासनाला अवघड होऊन बसले आहे.

आतापर्यंत अर्थसंकल्पातील लक्ष्यांकाप्रमाणे पालिकेने ५० कोटींची वसुली केली आहे. यामध्ये ३० कोटी रुपये पाणी देयक वसुलीचे आहेत. पाणी देयक वसुलीच्या इष्टांकाप्रमाणे वसुली करण्यासाठी पाणी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, तरीही पाणी कपात, पाणी गळतीमुळे वसुली लक्ष्यांकापर्यंत पोहचणे थोडे अवघड आहे.
तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता, पाणी विभाग, कडोंमपा