कल्याण-डोंबिवली महापालिकेचा निर्णय

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा भागात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्य़ात ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्या सुरू असले तरी होणाऱ्या गर्दीमुळे ६० पेक्षा अधिक वयोमान असलेले ज्येष्ठ नागरिक बाधित होण्याची भीती सातत्याने व्यक्त होत आहे. त्यामुळे स्वतंत्र केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर अंतिम टप्प्यात आला आहे.

लस घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून लसीकरण केंद्रांबाहेर येऊन उभे राहतात. काहींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर सहव्याधी असतात. व्याधींमुळे काहींना सतत स्वच्छतागृहात जावे लागते. त्यांची रांगेत असताना सर्वाधिक अडचण होते. काहींना पायाच्या दुखण्यांमुळे, सांधेदुखीमुळे पायऱ्यांवर चढता येत नाही. त्यांना लसीकरण केंद्रावर आणताना घरातील एक ते दोन जण येतात. त्यामुळे केंद्रावर अनावश्यक गर्दी होते, असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यासंबंधी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या पातळीवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा पूर्व, पश्चिम भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्यासंबंधी चाचपणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या शाळा, इमारतींमध्ये तळमजल्याला केंद्रे सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली. या केंद्रांवर फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या आणि दुसऱ्या लशीची मात्रा देण्याची व्यवस्था करण्यात येईल. इतर कोणत्याही लाभार्थ्यांला या केंद्रावर प्रवेश नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर फार ताटकळत राहावे लागू नये, ज्येष्ठ नागरिक राहत असलेल्या परिसरात ही लस मिळावी यासाठी प्रशासन टिटवाळा, डोंबिवली, कल्याण पूर्व, पश्चिम भागात ज्येष्ठांसाठी पाच ते सहा लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा विचार करत आहे. लवकरच केंद्रांच्या जागा निश्चित झाल्या की ती केंद्रे सुरू केली जातील.

– डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी