प्रत्येक गावात पाच हजार लिटरच्या दोन टाक्या, तर ४५ टँकरने पाणीपुरवठा
कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येकी गावात पाच हजार लिटरच्या दोन टाक्या बसविण्यात आल्या असून या टाक्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज ४० ते ४५ टँकरने गावांना पाणी पुरविले जात असून पाणीटंचाईच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे.
या योजना राबविण्यात येत असल्या तरी आम्ही किती दिवस गावांतील टाक्यांवरून पाणी भरायचे, गावांतील जलवाहिन्यांची पालिका प्रशासनाने तपासणी करावी, त्यानंतरच योग्य ते नियोजन करावे, जेणेकरून आम्हाला सतत या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
२७ गावांमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची समस्या आत्ताच उद्भवली नसून जिल्हा परिषदेच्या काळातही ही समस्या या गावांना भेडसावत होती. गावांमध्ये काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने कोटय़वधी रुपये खर्चून जल स्वराज्य योजना राबविली होती. कोणतेही नियोजन न करता गावांत बांधलेले हे जलकुंभ निकृष्ट दर्जाचे तर आहेतच, शिवाय काही ठिकाणी अर्धवट स्थितीत कामे टाकून ठेकेदारांनी पळ काढलेला आहे. जलकुंभ हे कमी उंचीच्या ठिकाणी बांधलेले असल्याने, शिवाय कमी इंचीच्या पाइपलाइन असल्याने गावकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ही योजना जर पूर्ण क्षमतेने राबविण्यात आली असती तर पालिकेवर हा अतिरिक्त बोजा पडला नसता. मात्र आता सध्या गावांत जी पाणीबाणी निर्माण झाली आहे, ती लक्षात घेता पाच कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गावांत दोन कूपनलिका खोदण्यात येत आहेत. पाच हजार लिटरच्या दोन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच विहिरींची साफसफाई व पंप दुरुस्तीही करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
या गावांमध्ये दररोज ४० ते ४५ पाण्याचे टँकर गावकऱ्यांच्या मागणीनुसार पाठविले जात आहेत. गावकऱ्यांना अशा प्रकारे पाणी मिळत असले तरी आम्ही अशा पद्धतीने किती दिवस टाक्यांवरून पाणी भरायचे. ग्रामीण भागातील सोसायटय़ा त्यांच्या वाहिन्यांवर बुस्टर लावतात. त्यामुळे आलेले पाणी त्यांच्याकडेच जाते. उंचवटय़ावरील लोकांना किंवा गावात लांब राहणाऱ्या लोकांना पाणी पोहोचतच नाही. या ज्या मुख्य समस्या आहेत त्यावर तोडगा पालिकेने काढावा; तरच ही पाणी समस्या सुटेल. परंतु पालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी पैसे घेऊन गप्प बसतात व कारवाई करत नाही. यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

पाण्याचा अपव्यय सुरूच
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना ताजी असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या खंबाळपाडा येथील जलवाहिनीवरील व्हॉल्व तुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाला ही माहिती देताच एक तासानंतर या वाहिनीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला. याविषयी पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज म्हणाले, वाहिनी फुटली नसून, त्यावरील एअर लॉक नीट बसला नसल्याने तो निघाला. परंतु त्वरित पाणी पुरवठा बंद करुन वॉल्व्ह नीट बसविण्यात आला आहे.