कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नियोजन; लसीकरणासंदर्भात जनजागृती मोहीम

कल्याण-डोंबिवली शहरात महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये दोन ठिकाणी करोना लसीकरणाची रंगीत तालीम शुक्रवारी सकाळी घेण्यात आली. आरोग्य सेवेतील लाभार्थ्यांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती. लसीकरणाचा कार्यक्रम योग्य नियोजनात पार पडला. येत्या काही दिवसांत करोना लसीकरणासंदर्भात जनजागृती मोहीम राबवून दर दिवशी १०० रहिवाशांना करोना लस देण्याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

लस आणि लसीकरणाची सामग्री वाढत जाईल, त्याप्रमाणे ही संख्या योग्य नियोजन करून वाढविण्यात येईल, असे ते म्हणाले. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात करोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नको म्हणून शुक्रवारी सकाळी कल्याण पूर्वेतील पालिकेच्या कोळसेवाडी आरोग्य केंद्रात, डोंबिवलीत पाटकर शाळेजवळील आरोग्य केंद्रात करोना लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. प्रत्येक केंद्रावर पाच लसीकरण अधिकारी उपस्थित होते. त्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. लसीकरणासाठी आरोग्य सेवेतील २५ लाभार्थ्यांची निवड केली होती. शासन आदेशाप्रमाणे  कोविन उपायोजनांचा आधार घेण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी आणि त्याला लघुसंदेश आल्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसमोर लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना लसीकरणासाठी पाचारण करण्यात आले. रहिवाशांच्या लसीकरणासाठी हीच पद्धत अवलंबिण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

लसीकरण झाल्यानंतर लाभार्थीला निरीक्षण कक्षात काही वेळ बसवून ठेवण्यात आले. त्याची तेथे दाखल होण्याची वेळ आणि तेथून सोडल्याची वेळ नोंदवहीत ठेवण्यात आली.

‘मध्यमवर्गीय, गरिबांना मोफत लस द्यावी!’

ठाणे : देशातील काही राज्यांनी करोनावरील लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारनेही केंद्र सरकारची मदत घेऊन मध्यमवर्गीय आणि गरिबांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे. गुरुवारी देवेंद्र फडणवीस कोपरी येथील ‘अटल बिहारी वाजपेयी एजल्स पॅराडाइस’ या कमानीच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. देशातील अनेक राज्यांनी करोनावरील लस मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारने केंद्र सरकारची मदत घेऊन मध्यमवर्गीय आणि गरिबांना मोफत उपलब्ध करून द्यावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

प्रत्यक्ष कार्यवाहीनंतर जनजागृती

लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कोणीही केंद्रावर येईल आणि लसीकरणासाठी घाई करेल, अशी गडबड लसीकरण केंद्रावर करू दिली जाणार नाही. लसीकरणासाठी अगोदर नोंदणी, ओळख आणि लसीकरण हाच आराखडा लसीकरणासाठी राहणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. लसीकरणाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्यानंतर जनजागृती मोहीम शहरात राबविली जाणार आहे.