मुंबई २६/११ हल्ल्यातील पोलिसांनी पकडलेला दहशतवादी अजमल कसाबची ओळख न्यायालयात पटवणाऱ्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन झालं आहे. मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ७० वर्षांचे होते. २६/११ हल्ल्यादरम्यान श्रीवर्धनकर हे अतिरेक्यांची गोळी लागून जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वी सदस्यांनी श्रीवर्धनकर यांना घराबाहेर काढलं होतं, त्यानंतर मुंबईतील सातरस्ता भागात फुटपाथवर श्रीवर्धनकर अन्न-पाण्याशिवाय पडून होते.

या भागात दुकान चालवणाऱ्या डिसूजा यांनी श्रीवर्धनकर यांना मदत केली. NGO मध्ये काम करणाऱ्या आपल्या एका मित्राच्या सहाय्याने डिसूजा यांनी श्रीवर्धनकर यांचा पत्ता शोधून काढला. पोलिसांकडून विशेष परवानगी घेतल्यानंतर श्रीवर्धनकर यांना कल्याणला नेण्यात आलं. स्थानिक रुग्णालयात प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार होत होते. महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धनकर यांची भेट घेऊन त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च भाजपा करेल असं आश्वासन दिलं होतं. याचसोबत श्रीवर्धनकर कुटुंबाला फडणवीस यांनी पक्षातर्फे आर्थिक मदतही जाहीर केली होती.

गेल्या काही महिन्यांपासून श्रीवर्धनकर यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे घरच्यांनी श्रीवर्धनकर यांची काळजी घेण्यास नकार दिला होता. लॉकडाउन काळात श्रीवर्धनकर आपल्या कल्याणमधील घरातून निघून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. अनेक दिवस उपाशी राहिल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. डिसूजा यांनी प्रसंगावधान दाखवत श्रीवर्धनकर यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरी पोहचवण्यात मदत केली. अखेरीस मंगळवारी रात्री श्रीवर्धनकर यांनी अखेरचा श्वास घेतला.