05 April 2020

News Flash

नालासोपाऱ्यातील प्रकारांकडे अन्न व औषध प्रशासनाची डोळेझाक

आरोग्यविषयक नियम पायदळी तुडवून जमिनीवरच पीठ मळून आणि लाटून खाकरा तयार केला जात आहे.

|| प्रसेनजीत इंगळे

भेसळयुक्त पदार्थाचे माहेरघर अशी ओळख बनलेल्या नालासोपारा शहरात आता गलिच्छ वातावरणात खाकरा तयार करणारे असंख्य कारखाने असल्याचे उघड झाले आहे. आरोग्यविषयक नियम पायदळी तुडवून जमिनीवरच पीठ मळून आणि लाटून खाकरा तयार केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. मात्र नागरिकांनीच असे पदार्थ विकत घेताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

नालासोपारा शहर सध्या भेसळयुक्त पदार्थाचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. येथे भेसळयुक्त दूध, मिठाई, पनीर बनवले जातात, शिवाय अगदी फळेदेखील घातक रसायनापासून पिकवून विकले जातात. त्यात आता खाकरा या पदार्थाची भर पडलेली आहे. खाकरा हा आरोग्यदायी पदार्थ म्हणून ओळखला जातो. जंक फूडला पर्याय म्हणून खाकरा खाल्ला जातो; पण नालासोपाऱ्यात घाणीच्या वातावरणात खाकरा तयार करणारे कारखाने आहेत. नालासोपारा पूर्वेतील मोरगाव, नगीनदास पाडा, अलकापुरी, संतोष भुवन परिसरात मोठय़ा संख्येने हे कारखाने सुरू आहेत. त्यातील बहुतांश कंपनीकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे कोणतेही परवाने नाहीत. या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या स्वादांचे खाकरे बनविले जातात आणि इतर प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने सीलबंद करून मुंबई, ठाणे, पालघर आदी परिसरांत वितरित केले जातात. विशेष बाब म्हणजे काही मोठे फरसाणवालेसुद्धा या कंपनीकडून आपले खाकरे बनवून केवळ आपल्या नावाचे पॅकिंग करून विकत असतात.

हे सर्व कारखाने घाणीच्या आणि अस्वच्छ वातावरणात आहेत. स्वच्छतेचे कुठलेच निकष त्यांच्याकडून पाळले जात नाहीत. कमालीच्या अस्वच्छतेत हे खाकरे बनविले आणि विकले जातात. कोणत्याही प्रकारची स्वच्छता न बाळगता जमिनीवर खाकरे मळून लाटले जातात. तव्यावर भाजल्यानंतर पुन्हा ते जमिनीवरच पॅकिंग केले जातात. हे तयार केलेले पीठ उघडय़ावर ठेवले जाते. त्यावर माश्या बसतात आणि कीटक फिरताना दिसतात.

विशेष म्हणजे हे खाकरे बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिठात रासायनिक रंग, स्वाद आणि टिकून राहण्यासाठी वेगवेगळे रासायनिक पदार्थ टाकले जात असल्याची माहिती स्थानिक रहिवाशी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते राज दसोनी यांनी दिली. इतके असतानाही अन्न व औषध प्रशासन अथवा महापालिका आरोग्य विभाग या संदर्भात कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. या कंपनीच्या मालकाकडे अन्न व औषध विभागाचे बनावट परवाने असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी रोहित पाटील याने दिली आहे. दलालांमार्फत कोणत्याही जागेची पाहणी करत अन्न व औषध प्रशासन अशा कारखान्यांना परवानगी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘पदार्थ घेताना तुम्ही सावधगिरी बाळगा’

सर्वात मोठी बाब म्हणजे भेसळखोरांनी वसईत मोठे साम्राज्य उभे केले असतानाही, वसईत अन्न व औषध विभागाचे कार्यालय नाही. यामुळे नागरिकांनी तक्रार करायची कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. अन्न व औषध प्रशासन याबाबतीत अनभिज्ञ आहे. मनुष्यबळ कमी असल्याने सर्वच ठिकाणी पाहणी करणे शक्य नाही; पण तरीही तक्रारी आल्यास आम्ही कारवाई करतो, असे अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त पी.एन. वाघमारे यांनी सांगितले. शासनाने मनुष्यबळ वाढविल्यास भेसळखोरांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे सांगून नागरिकांनीच असे पदार्थ घेताना सावधगिरी बाळगा, असा अजब सल्ला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 3:50 am

Web Title: khakra dirty space akp 94
Next Stories
1 मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यामुळे डॉक्टरला मारहाण
2 ठाण्यातील चौकांत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून चाचपणी
3 नागरी वस्तीत माकडांचा धुमाकूळ
Just Now!
X