तलावाची पाणीक्षमता एक हजार घनमीटरने वाढली; पाच टीएमसी पाणीसाठा रब्बी क्षेत्रासाठी उपयुक्त
ठाणे जिल्ह्य़ामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अनेक तलावांची गाळमुक्ती झाली असून त्यामुळे तलावांच्या पाणीसाठय़ामध्ये कमालीची वाढ झाली आहे. अंबरनाथमधील खरड गावाजवळ असलेल्या तलावाला दहा ते बारा वर्षांपासून दुर्लक्षामुळे अवकळा प्राप्त झाली होती. मात्र जलयुक्त शिवारमुळे या तलावाचे पुनरुज्जीवन झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेने या तलावामध्ये सुमारे एक हजार घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पुढील वर्षीच्या रब्बी हंगामध्ये भाजीपाला पिकाखालच्या क्षेत्रात वाढ करण्याचे ठरवले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील खरड गावी सिमेंट बंधारा असून २००३-२००४ मध्ये याचे बांधकाम करण्यात आले होते. सुमारे ५२०० घनमीटरपेक्षा जास्त क्षमतेच्या या तलावामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचत होता. त्यामुळे या बंधाऱ्यातील पाणीक्षमता घटली होती. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागातून या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आल्याने या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याची क्षमता सुमारे १००० घनमीटर इतकी वाढली आहे. हा तलाव गाळमुक्त झाल्यामुळे यंदा या तळ्यात ५२०० घनमीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे परिसरातील तीन हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून भूजलपातळीमध्येही चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे ठरवले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी या अभियानात प्रामुख्याने प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणच्या तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार उल्हासनगर उपविभागीय अधिकारी यांनी खरड येथील तलावाचे काम कमी कालावधीत पूर्ण केले. या तलावांतील पाणीसाठा आता ५ टीएमसीने वाढणार असून भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढणार आहे. शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणमध्ये डिझेल इंजिनाचा ५० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार असून रब्बी हंगामात या ठिकाणच्या भाजीपाला क्षेत्रात आणखी वाढ होईल, असा विश्वास जिल्हा कृषी अधिकारी महावीर जंगटे यांनी व्यक्त केला.