News Flash

खारबाव किल्ला न्यायाच्या प्रतीक्षेत

पोर्तुगीज इतिहासाचा साक्षीदार असलेला वसईजवळील खारबाव किल्ल्याची दुरवस्था झाली आहे.

खारबाव किल्ला न्यायाच्या प्रतीक्षेत
खारबाव किल्ल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे.

किल्ल्याच्या आवारात आरोग्य केंद्राचे बांधकाम; दुर्गप्रेमींचा संताप
पोर्तुगीज इतिहासाचा साक्षीदार असलेला वसईजवळील खारबाव किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. आधीच पडझड झालेल्या या किल्ल्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने किल्ल्याला धोका निर्माण झाला आहे. या इमारत बांधकामामुळे किल्ल्याचे मोठे नुकसान होत असल्याने ते थांबविण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.
वसईच्या चिंचोटी फाटा मार्ग परिसरात असलेल्या खारबाव गावातील एका लहानशा टेकडीवर खारबाव किल्ला उभारण्यात आलेला आहे. खारबाव किल्ल्यातच श्री जरीमरी मातेचे देवालय आहे. गावातील बहुतेक स्थानिकांना किल्लय़ाविषयी फारसे माहिती नसल्याने दुर्गसंवर्धन विषयाची पूर्णत: उपेक्षाच झालेली आहे. सध्या या किल्लय़ाच्या आवारात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने इतिहासप्रेमी आणि संशोधक संतप्त झाले आहेत. या बांधकामाकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे. पुरातत्त्व विभाग, स्थानिक व शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्व टिकवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

किल्ल्याचा इतिहास
१६ व्या शतकात पोर्तुगीजांनी खारबाव किल्लय़ाची उभारणी केली. १७३९ च्या मोहिमेत खारबाव कांबे फिरंगीपाडा प्रांत मराठय़ांनी जिंकला. खारबाव किल्लय़ाचे सध्याचे अवशेष पाहता याच्या चारही बाजूस बुरुजांच्या बांधकामाच्या खुणा दिसत आहेत. यातील एक भक्कम बांधणीचा बुरूज अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. या बुरुजात आत शिरण्यासाठी छोटेखानी प्रवेशद्वार आहे.

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे कोट, किल्ले, गड, दुर्ग अशा प्रकारे भुईसपाट करत राहिलो तर आगामी काळात इतिहासाची साधने पार नामशेष होऊन आपलेच अस्तित्व शोधणे कमालीचे अवघड होणार आहे. किल्ले वसई मोहीम व समस्त दुर्गमित्र परिवार संयुक्तपणे दुर्गसंवर्धन मोहीम आयोजित करून खारबाव किल्लय़ाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
– डॉ. श्रीदत्त राऊत, किल्ले वसई मोहिमेचे सदस्य

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 12:20 am

Web Title: kharbao fort waiting for the judgment
Next Stories
1 विष्णूनगरमधील टपऱ्यांवर लवकरच हातोडा
2 रेल्वे स्थानकांवर १४ नवी एटीएम यंत्रे
3 डायघरमध्ये गतीमंद मुलीवर अत्याचार
Just Now!
X