गेल्या तीन दिवसांपासून दररोज दहा तास वीजपुरवठा खंडित
गेल्या शनिवारपासून पावसाने जोर धरल्यापासून खारेगावात विजेचा खेळखंडोबा सुरू झाला असून गेल्या तीन दिवसांत या परिसरात दररोज सरासरी दहा तास वीजपुरवठा खंडित झाला. साकेत खाडीतील महावितरणच्या वीज वाहिन्यांमधील बिघाडामुळे शनिवारी रात्री ७.३० वाजता गेलेली वीज रविवारी पहाटे ५ वाजता आली. तर रविवारी पुन्हा वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने पारसिकनगर परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागला. तर सोमवारी दुपारी दोन तास वीजपुरवठा बंद झाल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले होते.
पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ऐन उन्हाळ्यात पाच ते सहा तास वारंवार वीज बंद करणाऱ्या महावितरणच्या यंत्रणांमध्ये पावसाळ्यात वारंवार बिघाड निर्माण होऊ लागले आहे. कळव्यातील खारेगाव परिसरामधील रहिवाशांना शनिवारी याचा अत्यंत भीषण अनुभव सहन करावा लागला. पावसाचा जोर असल्याने शनिवारी दिवसभर वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. शनिवारी रात्री अचानक सायंकाळी ७.३० वाजता वीजपुरवठा खंडित झाला. या वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण विचारण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात दूरध्वनी करणाऱ्या नागरिकांनाही कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले होते. साकेत खाडीतील वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने हा वीजपुरवठा खंडित झाला होता मात्र नागरिकांना याची कोणतीच कल्पना दिली जात नसल्याने नागरिकांचा संताप वाढत होता. पहाटे पाच वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र अवघ्या काही तासांतच पुन्हा यंत्रणेत बिघाड उद्भवल्याने पुन्हा वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार सुरू झाला. सोमवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित होण्याचे शुक्लकाष्ठ सुरू होते.

साकेत खाडीमध्ये झालेल्या बिघाडामुळे शनिवारी रात्री खारेगाव भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला असला तरी महावितरणने युद्धपातळीवर परिस्थिती नियंत्रणात आणली. पावसाचे वातावरण असल्याने वीज वाहिन्या तुटून वीजपुरवठा बंद होत असला तरी महावितरण तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत आहे.
– अशोक थोरात, कार्यकारी अभियंता, महावितरण