अगदी अपरात्री कॉलसेंटरवरून घरी येणारी तरुणमंडळी असोत वा रात्रीचे क्रिकेट सामने खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली मुलं असोत, ठाण्याच्या ठरावीक भागांत तरुणाईची ही गजबज सुरूच असते. अशा तरुणाईच्या ‘पोटपूजे’साठी शहरातील मोजक्या ठिकाणांवर सायकल टपऱ्या तैनात असतात. या रात्रीच्या खाऊगल्लीत चहा, कॉफी, इडली, पोहे, उपमा यावर ताव मारला जातोच; शिवाय सिगारेट, तंबाखूची ‘तलफ’ही या टपऱ्यांमुळे भागते.
ठाणे शहराला भेदणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीनहात नाका चौकात आणि तेथून काही अंतरावर एलबीएस मार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रात्री ‘सायकल टपऱ्या’ उभ्या राहतात. याशिवाय, मुलुंड चेकनाका, कापूरबावडी नाका परिसरातही अशाच सायकल टपऱ्या लागतात. रात्री अकरानंतर विक्रेते या परिसरात सायकल घेऊन येतात.इडली, दाबेली, चहा आणि सिगारेट, तंबाखू असं सगळं त्या सायकलच्या मागील स्टॅण्डवर मिळतं. दिवसा मिळणाऱ्या मूळ किमतीपेक्षा थोडय़ा अधिक दराने अर्थात नाइट चार्ज (रात्र दर) लावून त्याची विक्री होते. पण त्याला ग्राहकांचीही ना नसते.
अल्मेडा चौकातील कुल्फी
महापालिका मुख्यालयाजवळून ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अल्मेडा चौकात टोपलीतील कुल्फी मिळते. रात्री जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी जाणारी अनेक कुटुंबे या चौकात कुल्फी खाण्यासाठी येतात. तसेच रिक्षा आणि इतर वाहनचालकही कुल्फी विकत घेतात. हा कुल्फीवाला रात्री उशिरापर्यंत तेथेच असतो.
ठाणे स्थानकातील खाऊगल्ली
रात्री १.२० ची शेवटची लोकल गेली की, ठाणे स्थानकातील गर्दी पांगू लागते. लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी थांबलेले प्रवासी आणि त्यांच्यासाठी स्थानकाबहेर थांबलेले रिक्षाचालक सोडले तर स्थानक परिसर शांतपणे पहुडलेला असतो. अशा वातावरणात अशोक टॉकीजकडून सॅटिस पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर खाऊगल्ली फुलते. रात्री दीड ते दोन वाजेपर्यत बुर्जी पाव, अंडा पाव, वडा पाव, समोसा पाव आणि चायनीज मिळते, तर पहाटे याच भागात इडली, पोहे, उपमा, वडा पाव, भजी पाव असे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. याशिवाय, चहा आणि सिगारेट, तंबाखू आदी साहित्यही या परिसरात मिळते.
मुलुंड चेकनाका खाऊचा अड्डा
ठाणे आणि मुलुंड या दोन्ही शहरांच्या प्रवेशद्वारावरील मॉडेला परिसरात मोठय़ा प्रमाणात हातगाडय़ा लागत असून तिथे पावभाजी, बुर्जी पाव, चायनीज आदी खाद्य पदार्थ मिळतात. मात्र, रात्री एक ते दीड वाजेपर्यंत या हातगाडय़ा असतात. त्यानंतर या ठिकाणी सायकल टपऱ्या लागतात. मुलुंड चेकनाका परिसरातील सर्कलजवळील गोपालाश्रम हॉटेलचे पुढचे दरवाजे रात्री नियमानुसार बंद होतात. पण पाठीमागच्या दरवाजाने जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाते.