कॅफे चोकोलाड, सागर डेअरीजवळ, गोळेवाडी, शिवाजी चौक, बदलापूर (पू.)
वेळ- स. ११ ते रात्री १२
संकेत सबनीस
पल्या इथे खवय्यांना वडा, मिसळ, भजी आणि उडपी पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याची परंपरा तशी जुनीच आहे. मात्र, जमाना बदलला असल्याने आता नवनवे व वेगळे पदार्थ मिळू लागले आहेत. या नव्या जमान्यातील तरुणाईच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी एकाच ठिकाणी नाश्ता या सदराखाली मोडणारे नवनवे पदार्थ आता ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. खाद्यपदार्थाची ही नवी नवलाई काहीशी उशिराने का होईना बदलापुरातही येऊन ठेपली असून पिझ्झा, फ्रेंच फ्राईस, पोटॅटो पॉप्स, आइसक्रीम्स आणि विविध शेक्स हे आजच्या तरुणाईला भावणारे पदार्थ एकाच छताखाली मिळण्यास सुरुवात झाली आहे. बदलापूर पूर्वेकडील शिवाजी चौकातील ‘कॅफे चोकोलाड’ येथे तरुणाईला हे पदार्थ मिळत आहेत.
बदलापूर पूर्वेकडील शशांक नाटेकर व विलास गोळे यांनी गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला या ‘कॅफे चोकोलाड’ची सुरुवात केली. आवड व हौस यापोटी सुरू केलेले हे कॅफे चोकोलाड हे केवळ आइस्क्रीम पार्लर उरले नसून तिथे स्नॅक्स व केक आइस्क्रीम आणि फळ व चॉकलेट पदार्थाचे घट्ट शेक मिळतात. पारंपरिक आइस्क्रीमच्या बरोबरीने चिकू, आंबा, सीताफळ, अंजीर या सर्व फळांचे नैसर्गिक आइस्क्रीम येथे मिळतात. त्याचबरोबर गुलाबजामचे तुकडे असलेले गुलाबजाम आइस्क्रीम, चॉकलेटचे क्रश असलेले चोको चिप्स तर, आइस्क्रीम, केक आणि ब्राऊनी असलेले स्वीट मिस्ट्री हे कॅफे चोकोलाडचे विशेष आकर्षण आहे.
येत्या काही दिवसांत कालाजामुन, रसगुल्ला, मूगडाळ हलवा, मध, खजूर यांचा अर्क असलेले आइस्क्रीम त्यांच्याकडे सुरू होणार आहेत. त्यांच्या कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पातून त्यांच्यापर्यंत ही थंडगार आइस्क्रीम पोहचतात. या आइस्क्रीम्सच्या बरोबरीनेच लिक्विड चॉकलेटचे सर्व प्रकार त्यांच्या इथे उपलब्ध आहेत. लिक्विड चॉकलेट अधिक बेल्जियन पेस्ट व ट्रॉपिंग्सने सजलेले बेल्जियन चॉकलेट, अत्यंत वेगळे असे व्हाइट चॉकलेट व चॉकलेट पेस्ट असलेले व्हाइट चोकोलाड तर घट्ट चॉकलेट अधिक पांढरे चॉकलेट यांचे एकत्रित मिश्रण असलेले डे अॅण्ड नाइट हे प्रकार सध्या येथे येणाऱ्या तरुणाईची विशेष आवड बनले आहेत. तसेच, किटकॅट चॉकलेट, ओरीओ चॉकलेट आदी चॉकलेट व बिस्किटांचे मिश्रण असलेली लिक्विड चॉकलेटही अनेकांच्या पसंतीला उतरली आहेत.
सर्व ताज्या फळांची आइस्क्रीम असूनही प्रत्येक फळाचा गर व त्याचे आइस्क्रीम याचा समावेश असलेले फ्रू-शेक्सही येथे मिळतात. या सर्व पदार्थाच्या पुढे जाऊन विशेष पदार्थ मिळण्याची आमची अजून खासियत असल्याचे कॅफेचे नाटेकर सांगतात. ते सांगताना ते म्हणाले की, सिझलिंग ब्राऊनी, चॉकलेट सँण्डवीच, फ्रॉफी हे पदार्थ अन्य कुठेच मिळत नाहीत. यातील सिझलिंग ब्राऊनी म्हणजे गरम गरम उकळते चॉकलेट व त्यावर व्हॅनिला आइस्क्रीमचा थंडगार गोळा हा आगळा प्रकार आमच्याकडे आहे. तर, ब्रेडवर चॉकलेट पेस्ट व क्रश टाकून चीज आणि बटरसह तयार करण्यात आलेले चॉकलेट सँण्डवीच व असेच तयार होणारे हेझलनट पेस्ट, ड्रायफ्रुट्स टाकून तयार करण्यात आलेले हेझलनट सँण्डवीच हाही एक अभिनव प्रकार आहे. तसेच, माईल्ड कोल्ड कॉफी म्हणजेच फ्रॉफी आणि फ्रॉफी अधिक व्हॅनिला आइस्क्रीमचा घट्ट गोल गोळा अशी कोल्ड थिक कॉफी आदी भन्नाट पदार्थ आमच्या इथे मिळतात. याचबरोबरीने कुटुंबीयांसमवेत आलेल्यांसाठीदेखील स्नॅक्स पदार्थ येथे मिळतात. यात ताज्या भाज्या, गरम चिज, पनीरचा समावेश असलेले चार प्रकारचे पिझ्झा, गार्लिक ब्रेड्स, सँण्डवीचेस, चिली पॉप्स, पनीर टिक्का, पोटॅटो पॉप्स असे पदार्थही लोकप्रिय होत आहेत, असे नाटेकर यांनी सांगितले.
पॉट्स आइस्क्रीमपासून व्यवसायाला सुरुवात
कॅफे चोकोलाड सुरू केलेल्यांपैकी विलास गोळे यांनी सांगितले की, मी व माझे बंधू प्रल्हाद गोळे यांनी २५ वर्षांपूर्वी या जागेत घरगुती पॉट्स आइस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी दररोज कल्याणहून दूध आणून आइस्क्रीम बनवत असू. ही जागा छोटी असल्याने आम्हाला त्याचा त्रास होऊ लागला होता. मात्र, आता २५ वर्षांनी चांगला ब्रँण्ड सुरू करावा व लोकांना वेगळी चव द्यावी या हेतूने आम्ही कॅफे चोकोलाड सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याने आमचे हे धाडस यशस्वी ठरले. त्यामुळे आम्ही बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागात आमची दुसरी शाखा पुढील महिन्यात सुरू करत आहोत. तिथेही आम्ही असेच नवे पदार्थ ठेऊन तेथील खवय्यांना वेगळी चव देणार आहोत.