पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ६ तासांत सुखरूप सुटका

नालासोपारा येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या पाच वर्षीय मुलाची पालघर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या ६ तासांत सुखरूप सुटका केली आणि पाचही आरोपींना गजाआड केले. बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आरोपींनी हा कट रचला होता.

नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील सचिन वर्मा (५) या मुलाचे गुरुवारी चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपींनी अपहरण केले. पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ विशेष मोहीम हाती घेतली. तुळींज पोलीस ठाण्याचे तीन पथक आणि सायबर सेल कामाला लागली. संध्याकाळी ६ वाजता मुलाच्या वडिलांना ६ लाखांच्या खंडणीसाठी दूरध्वनी आला होता. खंडणीची रक्कम घेऊन चर्चगेटला बोलावले होते. सायबर सेलने त्या दूरध्वनीचे स्थळ शोधून काढले. पालघरजवळील सातपाटी येथून हा दूरध्वनी आला होता. सातपाटी आणि पालघर पोलिसांनी या परिसरात सापळा लावला. स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्य़ाचे प्रत्येक रस्ते, रेल्वे स्थानके, बस स्थानके, महामार्गावर नाकाबंदी केली. काहीही करून मुलाची सुखरूप सुटका करायची होती. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांना मुलाच्या आईकडे चौकशी करत असताना वर्मा यांचा मित्र शिवम याचे नाव समोर आले. शिवम हा बेरोजगार होता. घटनेनंतर त्याचा दूरध्वनी बंद होता. त्याचा क्रमांक झुबेर नावाच्या एका व्यक्तीच्या नावाने नोंद केलेला होता. झुबेर आणि शिवम यांचे दूरध्वनी बंद होते आणि तेच यातील सूत्रधार असल्याचे पोलिसांनी हेरले आणि त्यांचा माग काढण्यास सुरुवात झाली.

खंडणीसाठी आलेला दूरध्वनी मुकेश सकट याच्या मोबाइलवरून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मग मुकेश आणि त्याच्या सोबत असलेले भावेश भोईर आणि मुकेश राजपूत यांच्या घरावर पाळत ठेवली. जागोजागी नाकाबंदी, घरी पोहोचलेले पोलीस यांमुळे आरोपी घाबरले. त्यांना पळून जाण्याचा मार्ग बंद झाला होता. शिवम आणि झुबेरच्या घरच्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आपली योजना फसली हे लक्षात येताच मुलाचे अपहरण केलेल्या आरोपींनी रात्री माहीमच्या रस्त्यावर सचिनला टाकून पळ काढला. आरोपीच्या मागावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना तर पालघर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या अपहरण नाटय़ाचा सूत्रधार शिवम आणि झुबेरला तुळींज पोलिसांनी कौपरखैरणे येथून अटक केली.

शिवमला बॉलीवूडमध्ये नशीब आजमावयाचे होते. त्यासाठी पैशांची गरज असल्याने त्याने ही योजना रचली होती. पोलिसांनी थोडा तरी उशीर केला असता तर आरोपींनी अपहृत मुलाला मारून टाकले असते, असे दत्ता तोटेवाड यांनी सांगितले. पालघर पोलीस ठाण्याचे किरण कबाडी, स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक होनमाने आणि तुळींज पोलीस ठाण्याचे किशोर खैरनार यांनी संयुक्तपणे काम करून खंडणीचा हा डाव उधळून लावला.

शिवम हा प्रकरणाचा सूत्रधार होता. त्याने मुकेश सकट याला या योजनेत सहभागी करून घेतले, परंतु पैसे मिळाल्यावर शिवम आणि झुबेर इतर साथीदारांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणार होते. मात्र पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.

– अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक