नालासोपाऱ्यात एका विवाहित तरुणीवर अज्ञात इसमाने अतिप्रसंग करून हत्या केली. जाताना त्या महिलेच्या लहान बाळाला खंडणीसाठी पळवून नेले. या बाळाच्या सुटकेसाठी त्याने पाच लाखांची खंडणी मागितली. पोलिसांकडे कसलाच दुवा नव्हता. पण अनुभव, धाडस, प्रसंगावधान दाखवत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अवघ्या ५ तासात आरोपीला जेरबंद केले.

अंबाला देवासी (३०) ओक्साबोक्शी रडत होता. नालासोपारा येथील त्याच्या घरात त्याची तरुण पत्नी गटकीदेवी (२५) रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. कुणा अज्ञात इसमाने तिची निर्घृण हत्या करून अडीच वर्षांचा मुलगा प्रकाशला पळवून नेलं होतं. सायंकाळी पाच वाजता ही घटना उजेडात आली होती. घरात चोरी झालेली नव्हती. फक्त तिचा मोबाइल चोरला होता. अंबाला तसा दागिने बनविणारा कागागीर. आर्थिक परिस्थितीही सामान्य. मग चोरीचा उद्देश नव्हता तर काय होता? पत्नीची हत्या करून मुलाला पळवायचे कारण काय होतं? सारेच प्रश्न गूढ निर्माण करत होते. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून चौकशी करत होते. एवढय़ात गटकीदेवीच्याच मोबाइलवरून फोन आला. तो फोन अंबालाने उचलला. पलीकडून हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. तुझा मुलगा माझ्याकडे आहे. तो जिवंत हवा असेल तर पाच लाख रुपये दे.. ते ऐकून अंबाला गर्भगळीत झाला. पोलीसही चक्रावले. ज्याने गटकीदेवीची हत्या केली होती त्यानेच तिच्या मुलाला पळवले होते हे स्पष्ट झाले. जाताना त्याने गटकीदेवीचा मोबाइल पळवला होता. आणि त्याच मोबाइलवरून खंडणीसाठी फोन करत होता.
पालघरच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत, पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. काहीही करून मुलाची सुखरूप सुटका करणे गरजेचे होते. थोडासाही विलंब मुलाच्या जिवावर बेतू शकला असता. त्यामुळे पोलिसांनी वेगाने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. अंबाला देवासी हा मूळचा राजस्थानचा. सोन्याचे नकली दागिने (इमिटेशन ज्वेलरी) घडविण्याचा तो कारागीर. दोन वर्षांपूर्वी तो पत्नी आणि तान्ह्या बाळासह नालासोपाऱ्याच्या हनुमाननगरातील साई सहारा इमारतीत भाडय़ाच्या घरात राहायला आला होता. कष्टाळू स्वभावाचा अंबाला देवासी कुणाच्या अध्यात मध्यात न पडता आपलं काम करायचा. त्यामुळे कुणाशी वैर असण्याची शक्यता धूसर होती. अशात त्याच्या पत्नीची हत्या आणि मुलाचे अपहरण होण्याची घटना पोलिसांना चक्रावणारी होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी अंबालाला धीर दिला आणि त्याला आरोपीशी फोनवर बोलते ठेवले. त्यांच्या सांगण्यानुसार अंबालाने ‘माझ्याकडे पाच लाख नाहीत. पण तीन लाख द्यायला तयार आहे’ असे खंडणी मागणाऱ्याला सांगितले. तोपर्यंत होनमाने यांनी मोबाइल कंपनीशी संपर्क साधून अपहरणकर्त्यांच्या मोबाइल क्रमांकाच्या लोकेशनची माहिती देण्याच्या सूचना केल्या. भाईंदर, मीरा रोड, दहिसर अशा भागांत मोबाइल ‘लोकेट’ होत होता. यावरून आरोपी प्रवास करत असावा, असा कयास पोलिसांनी बांधला.
ठरवलेल्या योजनेनुसार पोलिसांनी तीन लाख रुपयांची व्यवस्था केली. जीपीएस यंत्रणा दडवलेल्या बॅगेत ही रोकड भरली. या काळात अंबाला सातत्याने अपहरणकर्त्यांच्या संपर्कात होता. मात्र अपहरणकर्ता त्याला कधी मीरा रोडला तर कधी बोरिवलीला येण्यास सांगत होता. दोन तीनदा असा चकवा दिल्यानंतर त्याने अंबालाला दहिसर फलाट क्रमांक पाचवर बोलावले. त्यानुसार साध्या वेशातील पोलीस अधिकारी रेल्वेने दहिसरला पोहोचले. कुणी फेरीवाला तर कुणी बूट पॉलिशवाल्याची भूमिका वठवली.
दहिसर स्थानकात पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचला होता. मात्र अचानक अपहरणकर्त्यांने अंबाला याला दहिसर नदीजवळील एका निर्जन ठिकाणी असलेल्या बसमध्ये मागील सीटवर पैशांची बॅग ठेवण्याची सूचना दिली. पोलिसांनी लागलीच आपलीही योजना बदलली. ती बस शोधून तिच्या आसपास पोलीस दबा धरून बसले. एक पोलीस कर्मचारी बसच्या खाली दडून बसला. अपहरणकर्त्यांने सांगितल्याप्रमाणे अंबालाने पैशांची बॅग बसमध्ये ठेवली व त्याला फोन करून कळवले. मुलगा तासाभराने घरी पोहोचेल, असे सांगत अपहरणकर्त्यांने त्याला निघू जाण्याची सूचना केली.
दरम्यान, अपहरणकर्त्यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन दहिसर पश्चिम दाखवत होते. त्या रस्त्यावरही वेशांतर केलेल्या पोलिसांचा सापळा लावण्यात आला. पोलीस आरोपीची वाट पाहात असतानाच रात्री दहाच्या सुमारास हातात छोटय़ा मुलाला घेऊन जात असलेला एक तरुण त्यांना दिसला. मनोज मोरे, शिवानंद सुतनासे, सचिन दोरकर या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला घेराव घातला आणि त्याची गचांडी धरली. एकाने पटकन मुलाला ताब्यात घेतले. अचानक समोर पोलीस पाहून आरोपी भेदरला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सुरेश कुमावर (२१) असे त्या आरोपीचे नाव होते. कामाच्या शोधासाठी दोनच महिन्यापूर्वी तो मुंबईला आला होता. नालासोपाऱ्यात एका ओळखीच्या व्यापाऱ्याच्या घरी तो राहात होता. अंबालाच्या घरी अनेक व्यापारी दागिने बनविण्यासाठी देण्यासाठी येत होते. एकदा या व्यापाऱ्यासोबत सुरेश अंबालाच्या घरी गेला होता. घरात गेल्यावर त्याची नजर अंबालाच्या पत्नीवर पडली. गटकीदेवी तरुण आणि सुंदर होती. त्यामुळे सुरेश तिच्याकडे आकर्षित झाला. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी तो एकदा अंबाला नसताना एकदा त्याच्या घरीही जाऊन आला. त्यानंतर आपला विकृत हेतू तडीस नेण्यासाठी २० ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी तो अंबालाच्या घरी गेला. सुरेश आधी दोनदा घरी आलेला असल्याने गटकीदेवीने त्याच्यासाठी दार उघडले. तेव्हा त्याने स्वयंपाकघरात नेऊन चाकूचा धाक दाखवून गटकीदेवीवर बळजबरी केली. यावेळी गटकीदेवी विरोध करू लागल्याने त्याने साडीने तिचा गळा आवळला आणि नंतर तिचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. त्यानंतर अंबालाच्या बाळाला घेऊन तो पळून गेला. पुढे या बाळाच्या सुटकेसाठी अंबालाकडून पैसे वसूल करण्याचाही त्याचा बेत होता. मात्र तो फसला.
आरोपीची कुठलीही माहिती नसताना अत्यंत चपळाईने कारवाई करून अवघ्या पाच तासात आरोपीला जेरबंद करण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पोलीस अधीक्षक शारदा राऊत, पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, तसेच शिवानंद सुतनासे, मनोज मोरे, सचिन दोरकर, संदीप मोकल, प्रदीप पवार आदींनी हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवले.