‘मेड इन चायना’ तोरणांपेक्षा कोल्हापुरी माळांना मागणी

भारत-पाकिस्तान यांच्यात बिघडलेले संबंध आणि चीनने पाकिस्तानला दिलेले समर्थन या पाश्र्वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असताना, ठाण्यातील बाजारपेठेत ग्राहकांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. एरवी दिवाळीला चिनी बनावटीच्या दिव्यांच्या तोरणांची खरेदी करणाऱ्यांचा मोर्चा आता कोल्हापूरमध्ये बनलेल्या विजेरी माळांकडे वळला आहे.

सजावटीसाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या चिनी बनावटीच्या विजेच्या दिव्यांच्या जोडीला बाजारात कोल्हापुरी विजेच्या दिव्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मेक इन इंडियाच्या संकल्पनेचा पुरेपूर फायदा घेत विक्रेत्यांकडून सोशल मीडियावर चिनी दिव्यांच्या तुलनेत कोल्हापुरी दिवे सरस असल्याची माहिती प्रसारित केली जात आहे. याचाही फायदा विक्रेत्यांना होत आहे.  कोल्हापुरी दिवे बाजारात स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहकांनी चिनी दिव्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणि कोल्हापुरी दिव्यांच्या प्रसारासाठी सोशल माध्यमाचा उपयोग करत चीनचा माल न वापरता स्वदेशी माल वापरण्याचे आवाहन केले आहे. ‘चायनीज लायटिंगला कोल्हापुरी ची फाइट’ अशा आशयाचा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करत कोल्हापूरमधील काही व्यावसायिकांनी वितरणाची क्लृप्ती वापरली आहे.

कोल्हापुरी दिव्यांच्या या व्यवसायाने कोल्हापूरमधील पाचशेहून अधिक महिलांना घरोघरी रोजगार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूर येथील पाचगाव, जवाहरनगर येथील महिलावर्ग दिव्यांच्या माळांचे बल्ब जोडणे, पीळ देणे, होल्डर बसविणे, कॅप बसविणे आदी कामे करतात आणि त्यानंतर या माळा विक्रीसाठी विविध शहरांत आणल्या जात आहेत.

विजेची बचत

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बेळगाव, गोवा, पुणे, ठाणे या ठिकाणी कोल्हापुरी दिव्यांचा प्रसार केला जात आहे. कोल्हापुरी दिवे एलईडी दिव्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याने विजेची मोठय़ा प्रमाणात बचत होते. कोल्हापुरी दिव्यांच्या माळा पन्नास फूट लांब असून प्रत्येक माळेत शंभर एलईडी बल्ब आहेत. यातील बल्ब खराब झाल्यास दुसरा बल्ब लावता येऊ शकतो, असे डोंबिवलीतील साई एन्टरप्रायजेस या दुकानातील विक्रेत्यांनी सांगितले.

किंमत

* एक रंगाच्या माळा – ५०० ते ५५० रुपये

* दुहेरी आणि तिहेरी रंगांच्या माळा – ५५० ते ६०० रुपये