अल्प आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील रहिवाशांसाठी दोन स्वतंत्र टप्प्यात घरबांधणी

कल्याण शहर आणि तालुक्याच्या वेशीवरील बारावे, खोणी आणि शिरढोण या गावांच्या हद्दीत अल्प आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील रहिवाशांसाठी दोन स्वतंत्र टप्प्यात २६ हजार १९२ सदनिका बांधण्याचा निर्णय म्हाडाचे उपअंग असलेल्या ‘कोकण म्हाडा’ने घेतला आहे. हे गृह प्रकल्प उभे करण्यासाठी अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया कोकण बोर्डाने सुरू केली आहे. येत्या तीन वर्षांत या घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट आखले आहे.

या प्रकल्पांच्या उभारणीसाठी २२२८ कोटी खर्च प्रस्तावित आहे. यात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी एकूण २१ हजार ५९२ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ४ हजार ६०० सदनिका बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचे गृह प्रकल्प संबंधित प्राधिकरणांनी प्राधान्याने राबवावेत, अशा सूचना केल्या आहेत. या योजनेचा भाग म्हणून अनेक वर्षांनंतर प्रथमच कल्याण परिसरात ‘कोकण म्हाडा’तर्फे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गृह प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. घरबांधणीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला कामाचे आदेश देणे, जागा निश्चित करून देणे, या प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. त्यानंतर विहित वेळेत गृह प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचा ताबा कोकण हाऊसिंग बोर्डाने घेऊन लाभार्थी निश्चिती, सदनिका वाटप या प्रक्रिया पार पाडल्या जातील, अशी माहिती कोकण हाऊसिंग बोर्डाचे कार्यकारी अभियंतानी दिली.

प्रकल्पामध्ये या तीन गावांचा समावेश

  • कल्याण पश्चिमेतील नागरीकरण झालेल्या ‘बारावे’ गावाच्या हद्दीत गट क्रमांक २७ या आरक्षित जमिनीवर ८३४ सदनिका बांधण्यात येणार आहेत. वाहनतळासह चौदा माळ्यांच्या इमारती बारावेच्या जागेत उभारण्यात येणार आहेत. या गृह प्रकल्पासाठी ७९ कोटी ७९ लाख रुपये म्हाडाने निश्चित केले आहेत.
  • कल्याण तालुक्यातील ‘खोणी’ गावात सव्‍‌र्हे क्रमांक १६२ वर चौदा माळ्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. डोंबिवलीपासून बारा किलोमीटर अंतरावर काटई ते बदलापूर रस्त्यावर हे गाव आहे. येथील गृह प्रकल्पात आर्थिक दुर्बल घटकांसाठी ७ हजार १५० सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ६६० सदनिका बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या गृह प्रकल्पासाठी ८७६ कोटी निधीची तरतूद आहे.
  • खोणीपासून पुढे तीन ते चार किलोमीटर अंतरावर ‘शिरढोण’ गाव आहे. या गावातील सव्‍‌र्हे क्रमांक ८६, ९५ या आरक्षित जमिनींवर सात माळ्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. दुर्बल घटकांसाठी १३ हजार ६०८, अल्प उत्पन्न गटासाठी २ हजार ९४० सदनिका बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी १२७ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

ऑनलाइन ई टेंडरपद्धतीने निविदा

या गृह प्रकल्पांच्या उभारणीसाठी ऑनलाइन ‘ई टेंडर’ पद्धतीने निविदा प्रक्रिया होणार आहे. निविदा कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने विकण्याची प्रक्रिया १३ जानेवारीपासून सुरू होईल. १४ फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर कामाचे आदेश देण्यात येतील. कामाच्या आदेशानंतर दोन वर्षांत हे प्रकल्प कंत्राटदाराने पूर्ण करायचे आहेत.