डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग जोडणारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणचा रेल्वे मार्गावरील कोपर उड्डाणपूल आजपासून (शुक्रवारपासून) अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

मे महिन्यामध्ये रेल्वेने कोपर उड्डाणपूल धोकादायक म्हणून जाहीर करून वाहतुकीसाठी बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या निर्णयास विरोध केल्यामुळे रेल्वेने पूल वाहतुकीसाठी बंद करणे थांबवले होते. मुसळधार पावसामुळे पुलाच्या भिंतींवर होणारा पाण्याचा निचरा विचारात घेऊन धोकादायक स्थितीत असलेल्या या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. हा विचार करून रेल्वेने अवजड वाहनांना हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाने तशी अधिसूचना जाहीर केली आहे, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

कोपर पुलासंदर्भात पवई ‘आयआयटी’मधील तज्ज्ञांनी रेल्वे प्रशासनाला अहवाल दिला आहे. या अहवालातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून या पुलाची अत्यंत महत्त्वाची व तातडीच्या दुरुस्तीची कामे रेल्वेने करावीत. पुलावरील रस्ता व इतर दुरुस्तीची कामे पालिकेने करावीत, असा निर्णय घेण्यात आला. कोपर पुलाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत जड, अवजड वाहनांनी ठाकुर्ली उड्डाणपुलाचा वापर करावा, असे पालिकेने जाहीर केले आहे. मनसेचे नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मे-जून महिन्यात पूल बंद केला तर सर्वाधिक हाल शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांचे होतील. मुले वेळेत शाळेत पोहोचणार नाहीत. वाहनातून प्रवास करणाऱ्या नोकरदारांना कोंडीचा फटका बसेल, असे सांगितले होते. त्यामुळे पूल बंद करण्याचा विचार मागे पडला होता.

शाळाचालकांनी रेल्वेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अवजड वाहने ठाकुर्ली पुलावरून ये-जा करतील, पण या पुलाचीही तेवढी क्षमता नाही. स.वा. जोशी शाळेजवळ पोहोचणारे रस्ते अतिशय अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.