रेल्वे अधिकाऱ्यांचे आमदार प्रमोद पाटील यांना आश्वासन; कल्याण, डोंबिवलीतील पादचारी, उड्डाणपुलांची कामेही होणार

डोंबिवलीतील कोपर उड्डाणपुलाचा बांधकाम आराखडा अंतिम करण्यात आला आहे. हा आराखडा येत्या दोन दिवसांत मंजूर करून काम लवकर सुरू केले जाईल. याशिवाय कल्याण, डोंबिवलीतील पादचारी, उड्डाणपुलांची कामेही लवकर केली जातील, असे आश्वासन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांना बुधवारी दिले.

आमदार पाटील यांनी नगरसेवक मंदार हळबे, पालिकेचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांच्यासह मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्यालयात भेट घेतली.

आमदार पाटील यांनी डोंबिवली पूर्व, पश्चिम जोडणारा मध्यवर्ती ठिकाणचा पादचारी पूल बंद असल्याने वाहनचालक, विद्यार्थी, पादचाऱ्यांना कसा त्रास होतो याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. या वेळी जैन यांनी कोपर पुलाचे बांधकाम आराखडे येत्या दोन दिवसांत मंजूर केले जातील. हे काम लवकर पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे सांगितले. कल्याण पूर्वेत मलंगपट्टी, चक्कीनाका, जिम्मीबाग, लोकग्राम भागात जाणारा रेल्वे स्थानकापासूनचा पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वेने बंद केला आहे. त्यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन रिक्षा स्थानक, रस्ता गाठावा लागतो. हा पूल किती काळ बंद ठेवला जाणार आहे, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. पूल बंद केल्यानंतर, तोडल्यानंतर तो लवकर सुरू होईल या दृष्टीने प्रयत्न करा, अशी मागणी करण्यात आली. लोकग्राम येथील पुलासंदर्भात लवकरच पालिका अधिकारी, रेल्वे अधिकारी यांची बैठक होऊन हा विषय ठेवण्यात येणार आहे, असे जुनेजा यांनी सांगितले.

‘पावसाळापूर्व सर्व कामे पूर्ण करा’

पत्रीपूल उभारणीसंदर्भात ‘एमएसआरडीसी’, पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त स्थळभेट करण्यात येणार आहे, असे जैन यांनी या वेळी शिष्टमंडळाला सांगितले. या सर्व पुलांची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा. मागील वर्षभर या रखडलेल्या पुलांमुळे लोक हैराण आहेत, असे पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.