पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचे आगार ठरलेल्या कोपरी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाला लवकरच मुहूर्त सापडण्याची चिन्हे असून येत्या पावसाळ्यानंतर या कामास सुरुवात करण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला आहे. गेल्या १५ वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे सुरुवातीला १२ कोटी रुपयांच्या या कामाच्या अंदाजपत्रकात एव्हाना सुमारे १०० कोटी रुपयांची वाढ होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या कोपरी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात प्रथम पुढे आणण्यात आला. मुंबई-नाशिक महामार्ग दोन्ही बाजूंस आठ पदरी असताना कोपरीच्या बाजूस तो चौपदरी होतो. गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे-भिवंडी-नाशिक-घोडबंदर या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या काही पटींनी वाढली आहे. या ठिकाणचा वाहनांचा वाढता भार लक्षात घेता या मार्गावर काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा विचारही केला जात आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्यातील अंतर्गत वाहनांचा भार येऊ नये यासाठी तीन हात नाका आणि नितीन कंपनी जंक्शन येथील उड्डाणपुलास जोडणारी थेट मार्गिका उभारण्याचा प्रस्तावही ठाणे महापालिकेने आखला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हे मोठे बदल आखले जात असताना कोपरी उड्डाणपुलावर अरुंद मार्गिकांमुळे वाहनांची मोठी कोंडी होण्याची भीती आहे. सद्य:स्थितीत सकाळच्या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तसेच सायंकाळी ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर कोपरी पुलावर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात. त्यामुळे आठ पदरी महामार्ग कोपरीजवळ खुंटतो, असे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी या पुलाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प आखण्यात आला आहे. मात्र, हा प्रकल्प नेमका कुणी मार्गी लावायचा यावरून प्रशासकीय यंत्रणांमध्ये एकमत होत नव्हते. सुरुवातीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या प्रकल्पाची आखणी करण्यात आली. मात्र, निधीच्या तुटवडय़ापासून आणि उड्डाणपुलाच्या वाढत्या खर्चामुळे सरकारने हात आखडता घेतला आहे.
एमएमआरडीएचा पुढाकार
दरम्यान या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून पुलाच्या आराखडय़ांना मंजुरी मिळाल्याने येत्या पावसाळ्यानंतर हे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात हे काम सुरू केल्यास महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळा ओसरताच हे काम सुरू करण्याचे ठरले असून ते १८ महिन्यांत पूर्ण करण्याची योजना आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. यासंबंधी ठाणे महापालिका समन्वयाचे काम पहाणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाचे आराखडे तयार करताना स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जयेश सामंत,