शनिवार, रविवारी रात्रीनंतर तुळई बसवण्याचे काम

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर लोखंडी तुळई बसविण्यात येणार असून त्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोपरी रेल्वे पुलावरील वाहतूक कळवा, मुंबई, नवी मुंबई, मुंब्रा, शिळफाटा, महापेमार्गे वळविण्यात येणार आहे. या मार्गावरून रात्रीच्या वेळेत अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. ही वाहतूक वळविण्यात आल्याने या वाहनांचा भार पर्यायी रस्त्यांवर वाढण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे कामे मध्य रेल्वे आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. त्याअंतर्गत गेल्या शनिवारी

एमएमआरडीएने कोपरी रेल्वे पुलाजवळील भुयारी मार्गावर मध्यरात्री अवघ्या सहा तासांत तुळई बसविण्याचे काम पूर्ण केले होते. त्यापाठोपाठ आता रेल्वे प्रशासनालाही रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या पुलाच्या भागावर सात तुळई बसविणार आहे. त्यासाठी  शनिवार, २३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेपासून ते रविवार, २४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत आणि रविवार, २४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेपासून ते सोमवार, २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत कोपरी रेल्वे पुलावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे.

या मार्गावरून मुंबईच्या दिशेने हजारो वाहने ये-जा करत असतात. करोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास बंद असल्याने अनेक जण खासगी तसेच स्वत:च्या वाहनांनी मुंबईत ये-जा करतात. त्यामुळे रस्तेमार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. तसेच रात्रीच्या वेळेत या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. त्यातच हे काम रात्री नऊ वाजेपासून मध्य रेल्वेकडून करण्यात येणार असून यामुळे येथील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली. मॉडेला चेकनाका, नवी मुंबई, मुंब्रा, कळवा भागांतूनही वळविण्यात येणार असून त्यामुळे या मार्गांवर वाहनांचा भार वाढून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाहतूक बदल असे हलक्या वाहनांसाठी

घोडबंदर आणि नाशिक मार्गावरून मुंबई जाणाऱ्या हलक्या वाहनांना नौपाडा सेवारस्ता, महालक्ष्मी मंदिर येथून कोपरी पुलावर जाण्यासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईत जाणारी वाहने साकेत रोड, क्रिकनाका, शिवाजी महाराज चौक, कळवा, विटावा, ऐरोली पूलमार्गे सोडण्यात येणार आहेत, तर घोडबंदरहून मुंबईत जाणारी वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह, कळवा, विटावा, ऐरोलीमार्गे किंवा तीन हात नाका येथून एलबीएस रोड, मॉडेला चेकनाकामार्गे किंवा बाराबंगला, आनंदनगर चेकनाका, मार्गे मुंबईच्या दिशेने सोडली जाणार आहेत.

जड वाहनांसाठी

नाशिकहून कोपरी रेल्वे पूलमार्गे मुंबईत जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असणार आहे. या मार्गावरील वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक, पारसिक रेतीबंदर, मुंब्रा बाह््यवळण, शिळफाटा, महापेमार्गे जाऊ शकतील, तर घोडबंदरहून मुंबईत जाणाऱ्या वाहनांना माजिवडा पुलाजवळ प्रवेशबंदी असेल. या मार्गावरील वाहने माजिवडा उड्डाणपूल येथून डावीकडे वळण घेऊन खारेगाव, मुंब्रा बाह््यवळण, शिळफाटा, महापेमार्गे जाऊ शकतील. ठाणे पोलिसांकडून मुंबईत जाणाऱ्या वाहनांसाठी हे बदल लागू करण्यात आले असले तरी मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या वाहनांसाठी मुंबई पोलिसांनी अजूनपर्यंत बदल लागू केलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.