ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बुधवारी पहाटे बिबट्या फिरताना दिसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने सकाळी खळबळ उडाली. कोरम मॉलवरुन हा बिबट्या सत्कार हॉटेलमधील पार्किंग परिसरात पोहोचला. वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर सहा तासांनी अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. या ठिकाणापासून जंगल लांब असल्याने  निवासी भागापर्यंत हा बिबट्या पोहोचलाच कसा, या प्रश्नाचे उत्तर दोन दिवसांनंतरही मिळाले नसले तरी या बिबट्या घुसखोरीमुळे चर्चेत आलेल्या कोरम मॉलने या घटनेचा फायदा आपल्या जाहिरातीसाठी करुन घेतला आहे.

समतानगर येथील कोरम मॉलमच्या पार्किंग लॉटमध्ये बिबट्या दिसला. त्यानंतर ही बातमी शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी मॉलबाहेर बघ्यांची गर्दी जमली. मॉलमधील पार्किंगजवळ बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर  मॉलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंतीवरून सकाळी साडे सहाच्या सुमारास बाहेर गेल्याचे निदर्शनास आले. पण दिवसभर या विषयाची चर्चा शहरामध्ये रंगली. सोशल मिडियावरीन या घटनेवरुन अनेक मजेदार विनोद व्हायरल झाले. याचाच फायदा घेत कोरमने या घटनेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या फेसबुक पेजवरुन बिबट्या प्रसंगावरुन तयार केलेली एक जाहिरात पोस्ट केली आहे.

या जाहिरातीमध्ये बिबट्याला जॅकेट पॅण्ट घालून मॉडेलच्या स्वरुपात दाखवण्यात आले आहे. या फॅशनेबल बिबट्याच्या बाजूच्या जागेत ‘जंगलातही ठाऊक आहे की ठाण्यामधली मोस्ट हॅपनिंग जागा कोणती आहे,’ असा मजकूर लिहीण्यात आला आहे. अनेकांना ही जाहिरात पसंत पडली असून अनेकांनी कमेन्ट सेक्शनमध्ये ठाण्यातील मित्रांना टॅग केले आहे.

कोरमची नवी जाहिरात

दरम्यान कोरम मॉलनंतर हा बिबट्या पोखरण रोडवरील सत्कार हॉटेल रेसिडन्सी येथील पार्किंग परिसरात गेला. सत्कार हॉटेलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वनखात्याच्या गाड्या हॉटेल परिसरात दाखल झाल्या. येथे जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनअधिकाऱ्यांना यश आले. बिबट्याला आधी बेशुद्ध करण्यात आले आणि  त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले.