News Flash

‘त्या’ प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम थांबवले

उड्डाणपुलाच्या मार्गात येत असल्याच्या तक्रारीनंतर पालिकेचा निर्णय

उड्डाणपुलाच्या मार्गात येत असल्याच्या तक्रारीनंतर पालिकेचा निर्णय

बदलापूर : बदलापूर शहरातील बहुप्रतीक्षित अशा उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता असताना त्या उड्डाणपुलाच्या मार्गात कुळगाव बदलापूर नगरपालिकेने शहराचे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी कमान बांधण्याचे काम सुरू केले होते. आमदार किसन कथोरे यांनी दिलेल्या तक्रार पत्रानंतर अखेर पालिका प्रशासनाने या प्रवेशद्वारावरील कमानीचे काम थांबवले आहे.

बदलापूर पश्चिमेला बेलवली येथे या कमानीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. आता उड्डाणपूल आणि कमान एकमेकांच्या मार्गात येतात का याची पडताळणी पालिका प्रशासनातर्फे केली जाते आहे. मात्र शहराचे नाक असलेल्या वास्तूचे काम थांबवणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली आहे.

बदलापूर पश्चिमेतील बेलवली भागात बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या वेशीवर काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्यासाठी काही दिवस मुख्य रस्त्यावरची वाहतूकही वळवण्यात आली होती. मात्र आ. किसन कथोरे यांनी या स्वागत कमानीच्या बांधकामावर आक्षेप घेत हे काम थांबवण्याची मागणी केली आहे.

बदलापूर पश्चिमेला बेलवली भागात ज्या ठिकाणी या स्वागत कमानीचे काम सुरू आहे तेथून जवळच बदलापूर शहरातील बहुप्रतीक्षित असा उड्डाणपूल उभा राहणार आहे. दोन वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाच्या कामासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्याच वेळी मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर या स्थानकादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा नवा आराखडा आल्याने या उड्डाणपुलाच्या आराखडय़ात बदल करण्याची वेळ आली. त्यामुळे या उड्डाणपुलाचा प्रस्ताव पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी पाठवला आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमुळे या उड्डाणपुलाच्या आराखडय़ातही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचा आराखडा तयार होण्यापूर्वीच स्वागत कमानीचे काम सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना विचारले असता, आमदारांचे पत्र मिळाल्यानंतर या कमानीचे काम थांबवले आहे. दोन्ही वास्तूंच्या आराखडय़ांची तपासणी केली जात असून ते एकमेकांना अडथळे ठरू शकतात का त्याचा आढावा घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल.

सेना-भाजप आमनेसामने

यापूर्वी येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार होते. रस्ता रुंदीकरणाच्या कामात त्याची पुरती वाताहत झाली होती. त्यावरून सत्ताधारी शिवसेनेला अनेक विरोधी पक्षांनी लक्ष्यही केले होते. सध्या ही कमान पूर्वीच्या जागेपेक्षा काही अंतरावर उभे करण्याचे काम सुरू होते. स्वागत कमानीच्या थांबलेल्या कामावरून अता सेना-भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 2:53 am

Web Title: kulgaon badlapur municipal council stopped entrance gate work zws 70
Next Stories
1 हाजीमलंगच्या पायथ्याशी पुन्हा रसायनांचे पिंप
2 ठाण्यात आज पालिकेच्या एकाच केंद्रावर लसीकरण
3 डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे निधन
Just Now!
X