कुळगाव-बदलापूर नगरपालिकेडून यंदा सार्वजनिक विसर्जन स्थळी कृत्रिम तलाव बांधण्यात आला नाही, ही खेदाची बाब आहे. कारण दरवर्षी बदलापूर गाव रस्त्याजवळील उल्हास नदीपात्रात गेल्या चार-पाच वर्षांपासून पालिकेडून कृत्रिम तलाव बांधण्यात येतो. मी व माझ्या अन्य मित्रांच्या कुटुंबातील गणेशमूर्तीचे आम्ही कृत्रिम तलावातच विसर्जन करत होतो. यंदा त्या उपक्रमाला आणखी प्रतिसाद मिळेल व त्यामुळे जलप्रदूषण कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पालिकेने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावच बांधला नाही, ही खेदाची बाब आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे कृत्रिम तलाव उभारण्यात आले नाहीत, असे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मधून वाचले. ही अत्यंत खेदाची बाब असून याप्रकरणी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. तसेच केवळ प्रशासनावरच याची जबाबदारी न ढकलता, याप्रश्नी पाठपुरावा न करणाऱ्या लोकप्रतिनिधींवरही दोषारोप केले पाहिजेत.

काही आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागात दोन कृत्रिम तलाव बांधून पालिकेसाठी चांगला आदर्श घालून दिला आहे. नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित न होण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम निर्विघ्न पार पाडावा, यासाठी पालिकेने यापूर्वी उचललेले पाऊल यापुढेही अखंड चालू राहावे हीच अपेक्षा असून, यासाठी आम्हा नागरिकांचा पाठिंबाही आहे.