बदलापूरच्या नागरिकांतर्फे मकरंद अनासपुरे यांच्याकडे मदतनिधी सुपूर्द
बदलापूर पूर्वेच्या कुळगाव सोसायटीतील नागरिकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५ हजार रुपयांचा निधी अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या शेतकरी कुटुंबीय मदत निधी अभियानाला दिला आहे. मुंबईत स्वत: मकरंद अनासपुरे यांच्याकडे हा निधी देऊन त्यांनी मदतीचे पाऊल उचलले आहे.महाराष्ट्रात मुख्यत्वे मराठवाडा व विदर्भात शेतकऱ्यांच्या गेल्या काही वर्षांपासून आत्महत्या होत असून अलीकडे यात वाढही झाली आहे. यावर आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारत ज्येष्ठ सिने अभिनेता नाना पाटेकर व विनोदी व तितकाच गंभीर असलेला अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप केले होते. याच अभियानाला साथ म्हणून आपलीही सामाजिक जबाबदारी म्हणून बदलापूर पूर्वेकडील कुळगाव सोसायटीतील रहिवासी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी  मिळून १५ हजार रुपये ही एका शेतकरी कुटुंबासाठीची मदत अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. १५ ऑगस्टला सोसायटीमध्ये झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमानंतर सोसायटीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी सर्वानुमते हा निर्णय घेऊन ही मदत केली आहे. मकरंद अनासपुरेने सोसायटीच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून ज्या शेतकऱ्याला ही मदत पाठविली जाईल, त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती कुळगाव सोसायटीला कळविली जाईल असे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे.

प्रसिद्धीसाठी नव्हे तर केवळ आमची सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही ही मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कुळगाव सोसायटीच्या वतीने दिली आहे. मोठय़ा मदतीत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला असून आमच्याकडील काही वाहन चालकांनीदेखील यात वाटा उचलला आहे. तसेच, मकरंद अनासपुरे यांना आम्ही एखाद्या कुटुंबाला निवारा व उत्पन्नाची गरज असल्यास तीही करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली आहे.

– महेश आपटे, सदस्य, कुळगाव सोसायटी