जिल्हा शासकीय रुग्णालयात बिनदिक्कत वावर; नागरिकांची सुरक्षा धोक्यात

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात काही दिवसांपासून गर्दुल्ल्यांच्या वावर असल्याने येथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाच्या आवारासह येथील औषधालय आणि क्ष किरण विभागाच्या बाहेर गर्दुल्ल्यांचा राजरोसपणे वावर सुरू झाला असून आवारातच त्यापैकी काही जण  झोपा काढत असल्याने रुग्णांचे नातेवाईक हैराण झाले आहेत. या गर्दुल्ल्यांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षक नसल्याने येथील स्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्य़ातील गरीब, गरजू तसेच आदिवासींवर अत्यल्प दरात उपचार केले जातात. त्यामुळे जिल्ह्य़ातील विविध भागांमधून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा आकडा बराच मोठा आहे. या रुग्णालयाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे आधुनिकीकरण तसेच नूतनीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने आखला असून लवकरच यासंबंधीची कामे सुरू केली जाणार आहेत.

सद्य:स्थितीत या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे सुरक्षेअभावी हाल होत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात मिळेल त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांनी पथारी पसरलेली दिसते. याशिवाय काही दिवसांपासून या ठिकाणी मद्यपी आणि गर्दुल्यांचाही वावर वाढलेला आहे. रुग्णालयाच्या केस पेपर आणि औषधालय विभागाच्या आवारात दुपार आणि रात्रीच्या वेळेत या मंडळींचा वावर अधिक असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

रुग्णालय प्रशासनाने सुसज्ज जागेत क्ष किरण आणि सोनोग्राफी केंद्र सुरू केले आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र या आसनांवर दुपारी गर्दुल्ले आणि भिकारी येऊन झोपत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.  रुग्णालयात सुरक्षारक्षक नाहीत. त्यात गर्दुल्ले आणि मद्यपींनी आवारातील काही जागांचा ताबा घेतला आहे. हा सारा प्रकार केवल तीन सुरक्षारक्षक कसा काय रोखणार, असा सवाल एका रुग्णाच्या नातेवाईकाने केला.

सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी अनेकदा मद्यपी, गर्दुल्ले झोपत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना या लोकांना झोपू न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय