रुग्णसेवेसाठी भविष्यात परिवहन बसचा वापर

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत दररोज शंभरहून अधिक करोना रुग्ण आणि त्याहून अधिक करोना संशयित सापडत आहेत. रुग्णांसह या संशयितांना रुग्णालय, विलगीकरण केंद्रात नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात  रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे आता परिवहन सेवेच्या बसचा वापर रुग्णांसाठी केला जाणार आहे.

मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे, तर आतापर्यंत १५३ रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. टाळेबंदीच्या पाचव्या चरणात राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या नियमाच्या शिथिलतेनंतर मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली. सरासरी ३० ते ४० रुग्णसंख्यावाढीचा वेग तब्बल सरासरी  १२०ते १३० वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत बाधित रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना रुग्णालयात आणि अलगीकरण कक्षात नेण्याकरिता रुग्णवाहिकेची कमतरता भासत असल्यामुळे हाल सहन करावे लागत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात संवेदनशील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पालिकेकडे केवळ मोठय़ा दोन रुग्णवाहिका उपलब्ध होत्या. त्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता सुरुवातीपासून भासत असल्यामुळे मोठय़ा रुग्णवाहिका चार आणि छोटय़ा दोन भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत, तर संपर्कातील रुग्णांना ने-आण करण्याकरिता तीन चारचाकी इको गाडय़ांचा वापर करण्यात येत आहे.

दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे रुग्णवाहिकेचा प्रश्न अधिक जटिल होत चालला आहे. खासगी रुग्णवाहिकाचे दर प्रचंड असल्यामुळे सामान्य नागरिकांना ते परवडत नाही यामुळे अनेक वेळा करोनाबाधित  रुग्णांचा अहवाल आल्यानंतरदेखील तब्बल पाच ते सहा तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून याविषयी गंभीर स्वरूपाची दखल घेऊन लवकरच रुग्णवाहिकेच्या सेवेकरिता रुग्णवाहिका कक्षाची निर्मिती करावी तसेच रुग्णंवाहिकांत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

घरी अलगीकरण न करता देखरेखीमध्येच ठेवणार

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या तसेच वाहतुकीकरिता अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका यामुळे भविष्यात पालिकेच्या बसचा वापर रुग्णांना ने-आण करण्याकरिता होणार असल्याची माहिती पालिकेचे नवे आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेकडे सध्या रुग्णांच्या सेवेकरिता खोल्या आणि बेड उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना घरी अलगीकरण न करता पालिकेच्या देखरेखीमध्येच ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.