किरणोत्सर्ग आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम; केवळ ६० ग्रामस्थांचे प्रबोधन; तालमीचे तीनतेरा

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आपत्ती धोके निवारण सप्ताहाअंतर्गत तारापूर अणुऊर्जा किरणोत्सर्ग आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम घेण्यात आली. या तालमीसाठी निवडलेल्या गावातील दोन हजार लोकसंख्येपैकी या तालमीत केवळ ६० ग्रामस्थांना या तालमीत सामील करून घेण्यात आले. संख्या कमी असतानाही तालमीत त्यांची सुरक्षा व्यवस्था करताना प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे येथे पाहावयास मिळाले. दरम्यान दोन हजार ग्रामस्थांमधून निवडलेले ६० ग्रामस्थांपैकी काही प्रबोधनात्मक माहितीपासून अनभिज्ञ राहिले.

आपत्ती धोके निवारण सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची निवड करण्यात आली. येथील आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीसाठी कुडण गावाची निवड करण्यात आली. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये १३ ऑक्टोबरच्या पहाटे बिघाड होऊन त्यामधून किरणोत्सर्गाचा विसर्ग होत असल्याची (खोटी) शक्यता गृहीत धरण्यात आली. आपत्ती उद्भवल्यास कुडण ग्रामस्थांचे संरक्षण कसे करावे या दृष्टीने आखण्यात आलेली रंगीत तालीम सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झाली. यामध्ये गावामध्ये किरणोत्सर्गाचा प्रसार झाल्याची माहिती देणे, ग्रामस्थांनी घरामध्ये बंदिस्त राहणे, नागरिकांना झालेल्या किरणोत्सर्गाची तपासणी करून त्यांचे बसमधून सुरक्षित स्थळी तारापूर येथे स्थलांतर करणे आदींचा त्यात समावेश होता. या रंगीत तालमीमध्ये महसूल, पोलीस, आरोग्य विभाग व एनपीसीआयएलचे (अणुऊर्जा प्रकल्प) अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

कुडण गावातील लोकसंख्या दोन हजारच्या जवळपास असतानादेखील जेमतेम ५० ते ६० ग्रामस्थांचे सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतर करण्यामध्ये प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत काही ग्रामस्थ देण्यात आलेल्या माहितीपासून अनभिज्ञ राहिले. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सहा किमी परिघात असलेल्या कुडण गावाची निवड तहसीलदार पालघर यांच्याकडून करण्यात आली होती.

आपत्तीजन्य स्थितीत नागरिकांना रेडिएशनची लागण झाली आहे का, ते यंत्राद्वारे तपासले जाते. त्यानंतर त्यांना एका बंद खोलीत ठेवून बसने दुसरीकडे नेण्यात येते. यादरम्यान बसच्या टायरला रेडिएशन लागले नाही याची तपासणी करून ताडपत्रीवर बस उभी करणे अशी तालीम घेणे अपेक्षित असते. परंतु कुडण येथे औपचारिकता पूर्ण करायची म्हणून ग्रामस्थांना तपासणी न करताच त्यांना मास्क लावून बसमध्ये बसायला सांगितले आणि तारापूर येथे नेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावरून परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षेच्या दृष्टीने इतररत्र नेण्यास प्रशासन यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून आले.

प्रकल्पाच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात नागरी वस्ती आहे. लाखोच्या घरात लोकसंख्या असतानादेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्तेदेखील अतिशय अरुंद आहेत. प्रत्येक वेळी आपत्कालीन स्थिती तालीम ही फक्त दिखावा म्हणून घेतली जाते, परंतु त्यातील त्रुटीवर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नाही, अशा तक्रारी येथील नागरिकांकडून केल्या जातात.

तालमीत काय अपेक्षित?

अपघातग्रस्त भागातील लोकांना किरणोत्सर्गापासून सुरक्षित ठिकाणी एका बंद खोलीमध्ये ठेवणे, किरणोत्सर्गाची बाधा होऊ  नये म्हणून आयोडिनच्या गोळ्यांचे वितरण करणे, सर्वाना मास्क लावून रेडिएशनचा प्रसार होऊ  नये म्हणून दक्षता घेणे आवश्यक असते. तसेच किरणोत्सर्गाची बाधा झाली आहे का हे यंत्राद्वारे तपासणी करणे, स्थलांतरासाठी मागविलेल्या वाहनाने सुरक्षित ठिकाणी नेण्याअगोदर वाहन ताडपत्रीवर घेऊन वाहनाला रेडिएशन बाधा झाली आहे का ते तपासणी करणे, आवश्यकता भासल्यास वाहन साबणाने धुऊन काढणे व त्यानंतर वाहनात सुरक्षितपणे नागरिकांना बसवून नियोजित स्थळी पोचवणे इत्यादी कामे करणे आवश्यक असते.

 अणुऊर्जा प्रकल्प परिसरात असुविधा

अणुऊर्जा प्रकल्प परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण वाढत चालले असून मोठमोठय़ा इमारतींना बांधकाम परवानग्या दिल्या जात आहेत. येथील रस्ते अतिशय अरुंद असून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास नागरिक बाहेर पडल्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यातच दांडी गावातील ग्रामस्थांना अणुऊर्जा प्रकल्पाकडूनच बोईसरकडे यावे लागते. या गावातील लोकांना दुसरीकडून एकही मार्ग नाही. बोईसर-तारापूर मुख्य रस्ता, अणुऊर्जा प्रकल्प पाचमार्ग मुख्य रस्ता, पाचमार्ग अक्करपट्टी येथून वाणगावला जोडणारा मुख्य रस्ता तसेच उनभाट येथून पथळाली हा नवीन रस्ता तयार करणे गरजेचे आहे. या भागातील दांडी या गावातून दांडी नवापूर खाडीवर पूल बांधण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत आहे. प्रत्यक्षात यावर प्रशासन गांभीर्याने विचार करत नसल्याने या पुलाचे कागदावरच नियोजन आहे.

सुनामीबाबत आपत्ती व्यवस्थापनसाठी एनडीआरएफ अंधेरी व विरार वसई महानगरपालिका यांच्यामार्फत रंगीत तालीम घेण्यात आली होती. त्याप्रमाणेच आपत्ती सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात आपत्कालीन स्थितीबाबत कुडण गावात ही तालीम घेण्यात आली. यावेळी येथील ग्रामस्थांना आपत्ती व्यवस्थापन तालमीत तपासणी करून तारापूर येथील शाळेत नेण्यात आले होते.   -महेश सागर, तहसीलदार, पालघर