वसईतील इमारती, सरकारी कार्यालये, आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणीच नाही

वसई-विरार शहरात पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निसुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जात असले तरी शहरातील इमारती, सरकारी कार्यालये, औद्योगिक कंपन्या, वाणिज्यविषयक आस्थापने, मॉल यांची अग्निसुरक्षा तपासणी झालेली नाही. त्यामुळे शहराला आगीचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आतापर्यंत केवळ ७४९ जणांना अग्निसुरक्षा करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

वेगाने वाढणाऱ्या वसई-विरार शहरातील टोलेजंग इमारती, औद्योगिक वसाहती, उपाहारगृहे, शॉपिंग मॉल यांची अग्निसुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) झालेली नाही. आग लागल्यास संबंधितांकडे काय उपाययोजना केलेली आहे, अग्निसुरक्षेची उपकरणे आहेत काय, संकटकाळी बचावाची मार्ग आहेत का आदी बाबी तपासून अग्निसुरक्षा प्रमाणपत्र दिले जाते. मात्र शहरातील अनेक इमारतींचे अग्निशमन विभागाच्या आस्थापनेमार्फत अग्निसुरक्षा तपासणी झालेली नाही, असे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर वसई-विरार शहरातील अग्निशमन विभागाने औद्य्ोगिक वसाहती, कारखाने, इमारती, धोक्याची ठिकाणे, उपाहारगृहे या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याची मोहीम जोरदार सुरू केली होती. मात्र काही महिने उलटून गेल्यावरही ही मोहीम थंडावली असल्याने अनेक इमारती, कारखाने, उपाहारगृहे, शाळा, दुकाने यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची अग्निसुरक्षा यंत्रणा न बसवता आणि अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी न घेता सरार्स चालवली जात आहेत. ३० मार्च २०१६ रोजी नवघर पूर्व येथील औद्योगिक वसाहतीला भीषण आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन विभागाने उद्योगांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली होती. मात्र अग्निसुरक्षेला बाधा आणणाऱ्या अतिक्रमणांवर कुठलीच कारवाई झालेली नव्हती. मी पालिकेचा अग्निसुरक्षा करण्यासाठी यापूर्वी पाच स्मरणपत्रे दिलेली आहेत. मात्र तरीही पालिका हा विषय गंभीरतने घेत नाही, असा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेदंवणकर यांनी केला आहे. वसई-विरार शहरात वारंवार लहान मोठय़ा आगीच्या घटना घडत आहेत. मात्र पालिका त्यापासून बोध घेत नाही. मोठी आगीची घटना लागल्यानंतर पालिकेला जाग येणार आहे का, असा सवाल त्यांनी केला.

अग्निसुरक्षेचे काम वेगाने होणे गरजेचे होते. मात्र पालिकेचा त्यांत संथपणा दिसून येत आहे. स्त्यालगची व्यावसायिक गाळे, शैक्षणिक संस्था, व्यापारी संकुल, गॅस गोदामे, पेट्रोलपंप, उपाहारगृहे, इमारती, बार, लॉजिंग, चित्रपटगृहे, नाटय़गृहे अशा विभागांना आतापर्यंत केवळ ७४९ अग्निसुरक्षा तपासणीबाबत नोटीस देण्यात आल्याचे अग्निशमन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी पाहणी केली जाते. ज्यांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत, त्यानुसार पाहणी करून त्या ठिकाणी परवानगी देण्यात येते.   -दिलीप पालव, मुख्य अधिकारी, अग्निशमन विभाग