ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाडय़ावर अजूनही वीज नाही; वन व महसूल विभागाच्या वादात ग्रामस्थांची ससेहोलपट
स्मार्ट सिटीचे आराखडे तयार करत कोटय़वधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे इमले एकीकडे शासकीय प्राधिकरणांमार्फत रचले जात असताना ठाण्यासारख्या मुंबईशी स्पर्धा करू पाहणाऱ्या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येऊर येथील जांभूळपाडा या आदिवासी पाडय़ातील रहिवासी अजूनही विजेविना अंधारात चाचपडत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. शासकीय यंत्रणांच्या लेखी येऊर येथील जांभूळपाडा परिसर सतरा क्रमांकाचा विभाग म्हणून ओळखला जातो. मात्र हा परिसर नेमका कोणाच्या हद्दीत येतो, यावरून महसूल आणि वनविभागात दुमत आहे. त्यामुळे राज्य विद्युत मंडळाने वीजजोडणी देण्याची तयारी दर्शवूनही या ठिकाणी अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. विशेष म्हणजे, येथील ग्रामस्थ वर्षांनुवर्षे मालमत्ता कर शुल्कही नियमित भरतात.
जांभूळपाडा परिसरात जवळपास चाळीस घरांमध्ये दोनशे ग्रामस्थ राहतात. येऊर परिसरातील रस्त्याला लागून असलेले हॉटेल्स आणि धनाढय़ांचे बंगले प्रकाशात लखलखत असले तरी जांभूळपाडय़ावरील आदिवासींच्या घरात मात्र कायम अंधार असतो. सूर्य मावळतीला गेल्यावर ग्रामस्थांची अंधारामुळे पायवाट बंद होते. रात्रीच्या वेळी पाडय़ावर प्रकाश नसल्याने बिबटय़ांचा सहज वावर पाडय़ावर होतो. अंधारात एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यावर मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उपस्थित राहात आहे. गावात वीज यावी यासाठी गावकऱ्यांनी वारंवार मागणी केल्यावर महाराष्ट्र विद्युत महामंडळाने पाडय़ावर वीज उपलब्ध करून दिली होती. मात्र पाडय़ाला लागूनच एका राजकीय नेत्याचा बंगला उभा राहताना हा खांबदेखील तोडण्यात आला, असे गावकऱ्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांपासून जांभूळपाडा आणि वनीपाडा परिसरांत वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र विद्युत महामंडळ प्रयत्न करत आहे. वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या जागेत वीजवाहिनी सुरू करण्यावर काही प्रमाणात र्निबध आहेत. त्यामुळे या भागात वीज खांबे उभारण्यास बऱ्याच तांत्रिक अडचणी उभ्या राहतात. हे कारण जरी पुढे केले जात असले तरी याच भागात असलेल्या काही राजकीय पुढाऱ्यांच्या बंगल्यांना मात्र नियमित वीजपुरवठा होत असल्याचे चित्र आहे.

कर भरूनही समस्याग्रस्त
जांभूळपाडा भागात राहणारे ग्रामस्थ अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेकडे मालमत्ता कराचा नियमित भरणा करतात. पाणी, रस्ते, शिक्षण, पाणी, मलनिस्सारणाचे शुल्क भरण्यातही हे आदिवासी ग्रामस्थ आघाडीवर आहेत. असे असताना येथील नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारच्या ठोस सोयीसुविधा नाहीत. दोनशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या या पाडय़ाला केवळ पाच हजार लिटर एवढेच पाणी दोन ते तीन दिवसांनी उपलब्ध होते. जांभूळपाडा परिसराप्रमाणेच वनीपाडा येथील नागरिकांना देखील याच समस्येला सामोरे जावे लागते आहे.
वनविभागाने याविषयी परवानगी दिल्यास या ठिकाणी वीज उपलब्ध करून दिली जाईल. सौरऊर्जेच्या माध्यमातून गावात वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या ठिकाणी प्रस्ताव मांडला असला तरी या परिसरातील मोठय़ा झाडांमुळे सौरऊर्जा निर्माण होणार नसल्याने हा प्रस्ताव देखील नाकारण्यात आला.
– मदन सांगळे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता