News Flash

कामगार रुग्णालयाला अनास्थेची बाधा

ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाची पुनर्बाधणी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच मंजूर केला आहे.

कामगार रुग्णालयाला अनास्थेची बाधा

बंद उद्वाहन, पाणीटंचाई, शस्त्रक्रिया कक्षाची दुरवस्था; जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे स्थलांतर करण्याचा विचार

ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू होताच या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांची वागळे इस्टेट परिसरातील कामगार रुग्णालयात तात्पुरती सोय करण्याचे मनसुबे शासकीय यंत्रणेमार्फत आखले जात आहेत. कामगार रुग्णालयाची अवस्था त्याहून भयावह असल्याने रुग्णांची आगीतून फुफाटय़ात अशी स्थिती होण्याची चिन्हे आहेत. बंद उद्वाहन, कोंदट आणि प्लास्टर निखळलेला शस्त्रक्रिया कक्ष, पापुद्रे निघालेल्या िभती, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असे चित्र या रुग्णालयात जागोजागी दिसते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा अतिरिक्त भार कामगार रुग्णालयाला सोसवेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाची पुनर्बाधणी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच मंजूर केला आहे. इमारतीची पुनर्बाधणी, आवश्यक दुरुस्ती तसेच इतर सुविधांसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुरुस्तीसाठी रुग्णालय काही महिने बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे दाखल होणाऱ्या रुग्णांची तात्पुरती सोय वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून ना हरकत दाखला मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कामगार रुग्णालयात अनेक वर्षांपासून सोयी सुविधांचा अभाव आहे. कामगार रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष वर्षांनुवर्षे बंद असल्याची माहिती रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी दिली. मलेरिया, ताप, अतिसाराच्या रुग्णांनाच येथे दाखल केले जाते. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना कामगार रुग्णालयाच्या अन्य शाखांमध्ये किंवा शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. रुग्णालयाचे उद्वाहक बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे. रुग्णांना पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर दाखल करण्यासाठी चादरीची झोळी करून त्यातून नेले जाते. तिसरा मजला तर चक्क बंद आहे. या रुग्णालयाचा चौथा मजला अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाला वापरण्यासाठी देण्यात आला आहे. रुग्णालयाची क्षमता २०० खाटांची असली तरी दिवसाला ५० हून अधिक रुग्ण या रुग्णालयात नसतात. रुग्णालयाच्या मागच्या बाजूस अनेक दिवसांपासून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव आहे. या रुग्णालयाचा पसारा ७३ हजार १९५ चौरस फूट इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळात असला तरी सोयी सुविधांअभावी ते निरुपयोगी ठरत आहे, अशी येथील कामगारांची तक्रार आहे. यासंबंधी रुग्णालय व्यवस्थापनाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूनही अधिक माहिती सांगण्यास नकार देण्यात आला.

कामगार रुग्णालयातील दुरुस्तीची कामे करण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. रुग्णाला कोणताही त्रास  होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येईल.

एस. जी. काटकर, अधीक्षक, कामगार रुग्णालय 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 3:49 am

Web Title: lack of facility in thane kamgar hospital tmc
Next Stories
1 जप्तीचा अतिउल्हास मावळला!
2 २९ गावे अधांतरी!
3 लष्कराकडून पंधरा मिनिटांत पूल उभारणी