गेल्या दशकात ठाणे जिल्ह्य़ात सर्वत्र जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. जंगलांमधील वणवे (आगी) हा नवीन प्रकार नाही. ‘जीवो जीवस्य जीवनम’ उक्तीप्रमाणे डोंगराळ, दुर्गम भागात राहणारा रहिवासी पावसाळ्यातील चार महिन्यात पिकवलेले भात पीक, उडीद, नाचणी व इतर कडधान्य शेतातून काढून घरात आणलं की मोकळा होतो. डिसेंबर ते मे या काळात काही ग्रामस्थ उपजीविकेचे आणखी एक साधन म्हणून जंगली प्राण्यांकडे वळतात. पावसाळ्यात बेफाम वाढलेल्या गवतात शिकारींना ससा, तरस, भेकर, मोर, ससाणा, रानडुक्कर दिसण्यास अडथळा आणतात. रानझुडपांच्या आडोशात राहणारी रानपाखरं, लावऱ्या आणि तत्सम पक्षी शिकारींच्या टप्प्यात येत नाहीत. हे अडथळे दूर करण्यासाठी शिकारी डिसेंबरनंतर जंगलांना आगी (वणवे) लावण्याचा ‘उद्योग’ सुरू करतात. वाडीतील ३० ते ४० जण ‘खोड’ (प्राणी शोध) काढण्यासाठी जंगलांमध्ये पायपीट करतात. प्राण्यांची लपून बसण्याची ठिकाणे जाळून खाक केली की, शिकारींचे काम हलके होते. डिसेंबर ते मेपर्यंत शिकारी मंडळी मोलमजुरी करून दोन पैसे कमरेच्या गाठीला ठेवतात. महिला वर्ग शेतातील कामे, लाकूडफाटा विकणे, भाजीपाला विकणे अशी कामे करून घर चालवितो. पुरुष शिकार कामासाठी मोकळे राहतात.

खरे मारेकरी

ठाणे जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भाग दुर्गम, डोंगराळ आहे. जव्हार, डहाणू, तलासरी, पालघर, शहापूर, मुरबाड, वाडा परिसरातील निसर्गाने वाढविलेली वनसंपदा डिसेंबर ते मे पर्यंत वणव्यांनी नष्ट केली जाते. हिरव्यागार वनसंपदेची वणव्यांमुळे राख-रांगोळी होऊन तेथे काळ्याकुट्ट रांगोळ्या तयार होतात. आगीमुळे जंगली प्राणी जीव वाचविण्यासाठी आडोसा शोधण्यासाठी जंगलाच्या दुसऱ्या भागात पळतो. जंगले जाळून झाली की मग शिकारी गटाने मार्च ते जून कालावधीत रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत प्रखर झोताच्या विजेऱ्या (बॅटऱ्या) घेऊन ससे, तरस, ससाणे, भेकर, मोर, हरीण, रानडुक्कर शोधण्यासाठी निघतात. या वेळेत प्राणी निद्रिस्त असतात. त्यांच्यावर अचानक प्रखर विजेचा झोत पडला की ती कावरीबावरी होतात. शिकारी त्यांचा पाठलाग करून दमछाक करतात. एखादा प्राणी दमून पडला तर त्याला भाला, गोफणीच्या साहाय्याने जायबंदी करतात. रात्री निसटलेला प्राणी दिवसा पकडण्यासाठी ही मंडळी जंगलात नायलॉन, लोखंडी तारांची जाळी लावतात. त्याला जाळ्यात अडकवून ठार मारतात. वर्षांतून एकदा शिकार केलेल्या जंगली प्राण्याचे रक्त प्याले की वर्षभर कोणताही आजार होत नाही, शरीराला तरतरी येते, असा गैरसमज दुर्गम भागातील रहिवाशांचा असतो.

त्यामुळे ही काटक मंडळी शिकारीसाठी तडफडत असतात. आपण निष्पाप जीव हिंस्त्र पद्धतीने नष्ट करीत आहोत याचे भान शिकारींना नसते. जंगली प्राण्यांचा चारा नष्ट होतो. यापूर्वी गाव-वाडय़ांमध्ये ५०० ते ६०० गाई, बैल, म्हशी असायच्या. गाव परिसरातील जमीन, जंगलांमधील गवत हे पाळीव प्राण्यांचा चारा असायचा. आत यांत्रिकीकरणातून शेती केली जाते. गावोगावच्या जमिनी धनाढय़ांनी विकत घेतल्या. गाईगुरांना चरायला जागा नाही. गावांमध्ये गाई-गुरांचे कळप राहिले नाहीत. यापूर्वी जनावरांकडून जंगलातील गवत पावसाळ्यात फस्त केले जायाचे. ते आता जनावरेच नसल्याने पावसाच्या पहिल्या थेंबापासून वाढायला लागते. चार महिन्यात हे गवत आठ ते नऊ फुटाचे होऊन ते झाडाच्या शेंडय़ाला पोहचते. वणवा लागला की वाळून कोळ झालेले गवत ‘इंधना’सारखे पेटून झाडांना लपेटून टाकते.

वनसंवर्धक गाढ झोपेत

जंगलांचे संवर्धन करण्याचे काम राज्याच्या वन विभागाचे आहे. पूर्वीसारखी घनदाट जंगले, जंगलतोड (किटा), चोरटी लाकूड वाहतूक आता राहिली नाही. वातानुकूलित कार्यालयात बसून हद्दीतील वनांचे रक्षण करणारे वनपाल, वनक्षेत्रपाल, वनसेवक यांच्या कार्यालयीन वेळेचा वनांचा वाढता ऱ्हास पाहून विचार करण्याची वेळ आली आहे. जंगले वणवे, शिकाऱ्यांपासून वाचवायची असतील तर, राज्याच्या वन विभागाने वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रात्री पाळीत जंगल भागात तंबू ठोकून डय़ुटी करण्याची सक्ती केली पाहिजे. जेव्हा वनाधिकारी शिकारींना पकडून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करतील, तेव्हा त्यांच्यावर वचक बसेल. वन कर्मचाऱ्यांनी किमान ऑक्टोबर ते जून या कालावधीत दिवस, रात्री पाळीमध्ये जंगल रक्षणासाठी काम केले पाहिजे. मात्र अंगाला तोशीस, शरीराला कष्ट देण्याची सवय राहिली नसल्याने वन विभाग ही भीषण परीस्थीती उघडय़ा डोळ्याने पाहत आहे.

भगवान मंडलिक

bhagwan.mandlik@expressindia.com