किशोर कोकणे

अपघातांतील जखमी प्रवाशांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहनाचा अभाव

मध्य रेल्वेवरील ठाणे, कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांत रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अपघात झाल्यास जखमींना रेल्वे गाडी आणि रिक्षातून ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची वेळ लोहमार्ग पोलिसांवर येत आहे. रुग्णांचे असे हाल होत असताना रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे.

अपघात झाल्यास रुग्णाला तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी रेल्वे स्थानक परिसरात रुग्णवाहिका तैनात ठेवण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सुमारे १० वर्षांपूर्वी दिल्या होत्या. मात्र, अद्याप रेल्वे प्रशासन सर्व स्थानक परिसरांत रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ शकलेले नाही. पूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात पश्चिमेला एक खासगी रुग्णवाहिका उपलब्ध असे. मात्र, काही महिन्यांपासून तीदेखील दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे अपघात झाल्यास स्थानक परिसरातील रेल्वे कर्मचाऱ्यांना संबंधितांशी संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवण्यास सांगावे लागते. त्यात वेळ वाया जातो आणि रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते.

कळवा स्थानकाची परिस्थितीही अशीच आहे. मध्य रेल्वे मार्गावर या रेल्वे स्थानकात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या कळवा स्थानकात एकही रुग्णवाहिका नाही.  आम्ही रुग्णवाहिकांशी संपर्क साधतो. त्यानंतरच, रुग्णवाहिका येते, असे एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले. मुंब्रा रेल्वे स्थानकाची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. या रेल्वे स्थानकात वर्षभरापूर्वी वन रुपी क्लिनिक सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ते बंद आहे. जखमी झालेल्या रुग्णांना मुंब्रा येथून ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी आणावे लागते. १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधल्यास या भागात ती रुग्णवाहिका क्वचितच उपलब्ध होते. गेल्या सहा महिन्यांपासून खासगी रुग्णवाहिका चालकानेही रुग्णवाहिका देणे बंद केले आहे.

आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करतो. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळत नाही. अनेकदा रुग्णांना रेल्वे गाडीतून न्यावे लागते. गर्दीची वेळ असल्यास रुग्णाला कसे न्यावे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे आम्ही रिक्षाने त्याला ठाण्यात आणतो अशी धक्कादायक माहिती लोहमार्ग पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

मध्य रेल्वेवरील ८५ रेल्वे स्थानकांपैकी केवळ २४ स्थानक परिसरांत १०८ ही रुग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र तिची सेवा पुरेशी नाही. अपघात झाल्यास रुग्णाला थेट ठाण्यातील सरकारी रुग्णालयात न्यावे लागते. त्यात बराच वेळ जातो. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरातील काही रुग्णालयांशी करार केल्यास हा गंभीर प्रश्न सुटू शकेल.

– समीर झवेरी, माहिती कार्यकर्ते

ज्या रेल्वे स्थानकांत रुग्णवाहिका नाही, त्या स्थानकांत ती उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.

– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे