नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडी

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पालिका आणि वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्याने येथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. खासगी कंपन्यांच्या बसगाडय़ा, रिक्षाचालकांची बेशिस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे या मार्गाने जाणेही आता प्रवाशांना नकोसे झाले आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून हजारो प्रवासी ये-जा करत असतात. शहराच्या विविध भागांतून येणारे प्रवासी ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा तसेच रिक्षांनी स्थानक परिसर गाठत असतात. मात्र यासोबतच खासगी वाहने, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस यांचीही ठाणे परिसरात गर्दी होते. सकाळ-सायंकाळच्या वेळेत ही गर्दी आवरणे कठीण होऊन बसते.

स्थानक परिसरातील वाहतूक नियोजनासाठी महापालिकेने सॅटिस पुलाची उभारणी केली. या पुलावरून परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ांची वाहतूक होते, तर पुलाखालून रिक्षा तसेच अन्य खासगी वाहने मार्गक्रमण करतात. परंतु रिक्षा थांब्यावरील बेशिस्तीमुळे येथून अन्य वाहनांना मार्गक्रमण करणे अशक्य होऊन बसले आहे.

या कोंडीचा परिणाम स्थानकाला जोडणाऱ्या गोखले रोड, शिवाजी पथ, बाजारपेठ, मासुंदा तलाव, राम मारुती रोड, जांभळी नाका, टेंभी नाका या भागांतील रस्त्यांवरही दिसून येतो. स्थानकातून बाहेर पडून गोखले मार्गाच्या दिशेने जाण्यासाठी एक अरुंद रस्त्यावर वळण आहे. या वळणावरच शेअर रिक्षा उभ्या राहत असल्यामुळेही कोंडीत भर पडते.

पूर्वेकडेही कोंडी

ठाणे, घोडबंदर तसेच भिवंडी भागात नोकरीनिमित्त अनेक जण प्रवास करतात. संबंधित कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांसाठी ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भागातून खासगी बसगाडय़ांची वाहतूक करण्यात येते. कोपरी सर्कलपासून ते स्थानकापर्यंतचा मार्ग अरुंद आहे. या बसेसना स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रवेश देणाऱ्या वाहतूक पोलिसांना येथील वाहतुकीचे योग्य नियोजन करणे मात्र जमलेले नाही.