महापालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच असलेल्या कचराळी तलावाची दुरवस्था झाल्याची बाब पुढे येताच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने शुक्रवारी तलावाचा पाहाणी दौरा केला. या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कोणत्याही स्थितीत दोन आठवडय़ांत तलाव सुस्थितीत आणण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
एकेकाळी ठाणे शहरामध्ये ७५ हून अधिक तलाव होते. त्यामुळे तलावांचे शहर म्हणून ठाणे ओळखले जाते, मात्र आता शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच तलाव शिल्लक राहिले आहेत. या तलावांच्या सुशोभीकरणावर महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. असे असतानाही अनेक तलावांची दुरवस्था झाल्याचे चित्र असून त्यापैकी काही तलावांच्या पाण्यावर हिरवा तरंग आल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, महापालिका मुख्यालय इमारतीच्या समोरच असलेल्या कचराळी तलावाची दुरवस्था झाली आहे. ही बाब पुढे येताच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी कचराळी तलावाची पाहणी केली. त्यावेळी स्थानिक नगरसेवक नारायण पवार आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.