जलशुद्धीकरण यंत्राची चोरी; प्रसाधनगृहही नाही

सोपारा गावातील ऐतिहासिक आणि पुरातन बौद्ध स्तुपाची दुरवस्था झाली आहे. स्तुपाच्या प्रवेशद्वाराची पडझड झाली असून महापालिकेने ठेवलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचीही चोरी झाली आहे. स्तुपात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाधनगृहाचीही सोय नसून बसण्याचीही व्यवस्था नाही. स्तुपाची दररोज स्वच्छताही होत नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावात अडीच हजार वर्षे जुने बौद्ध स्तूप आहे. गौतम बुद्ध यांच्या वास्तव्यामुळे हा स्तूप जगभरातील बौद्ध संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या स्तुपाला भेट देण्यासाठी देशातून तसेत आंतरराष्ट्रीय स्तरातून बौद्ध अनुयायी आणि पर्यटक येत असतात. मात्र बौद्ध स्तुपाच्या परिसरात कुठल्याच सोयीसुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत असते.

हा स्तूप पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे महापालिकेला सुविधा देता येत नाही. पुरातत्त्व खात्यानेही काहीच सुविधा दिलेल्या नाहीत. महापालिकेने मार्च महिन्यात येथे येणाऱ्या अनुयायांसाठी अडीच लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली होती. मात्र स्तुपाजवळ कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्या यंत्राचीही चोरी झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने फिरते शौचालय देण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र त्याची व्यवस्था अद्याप केलेली नाही. येथे एखादा कार्यक्रम असेल तरच महापालिकेकडून फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात येते. मात्र अन्य वेळी येथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत असते.

या बौद्ध स्तुपाला हजारो पर्यटक, बौद्ध भिक्खू, अनुयायी भेट देत असतात. मात्र तिथे प्राथमिक सोयीसुविधाही नसल्याने त्यांची गैरसोय होत असते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समितीचे सचिव नरेश जाधव यांनी सांगितले. स्तुपाच्या परिसरात बसण्यासाठी बाकेही नाहीत. त्यामुळे इथे येणारे बौद्ध भिक्खूआपल्यासोबत तंबू घेऊन येतात, असे ते म्हणाले. स्तुपाची दररोज स्वच्छता होणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेतर्फे ही स्वच्छता केली जात नसल्याचे ते म्हणाले.

स्तुपाच्या मार्गावर महापालिकेने भव्य प्रवेशद्वार बनवले होते. या प्रवेशद्वारावरील मूर्तीही निखळून पडू लागल्या आहेत.

पर्यटनविकास रखडला

बौद्ध स्तुपाच्या ६५ एकर परिसराचा विकास करण्यात येणार होता. राज्य शासन, पर्यटन विभाग आणि बुद्धिस्ट हेरिटेज अ‍ॅण्ड कल्चर सेंटरतर्फे हा विकास केला जाणार होता. त्यात स्मारक, अभ्यास केंद्र, विश्रांतिगृह, हॉटेल, उद्याने आदींचा समावेश होता. याशिवाय बौद्ध संस्कृतीचे वास्तुसंग्रहालय तयार केले जाणार होते. या प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र हा प्रकल्पदेखील रखडला आहे. बौद्ध स्तुपाच्या परिसराला अतिक्रमणाने वेढा घातला आहे. ३४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे.